अभिनेता सुबोध भावेचे गेल्या दोन महिन्यात 'संगीत मानापमान' आणि 'हॅशटॅग तदैव लग्नम' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्त सुबोधने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. सुबोध लिहितो की, "नमस्कार, गेल्या महिन्याभरात प्रदर्शित झालेले माझे दोन्ही चित्रपट हॅशटॅग तदैव लग्नम आणि संगीत मानापमान तुमच्या भरघोस प्रतिसादाने उत्तम चालू आहेत. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार."
सुबोधने पुढे लिहिलं की, "तुम्हाला चित्रपटगृहात न येण्याची अनेक कारणं होती, पण तरीही तुम्ही चित्रपटगृहात आलात आणि चित्रपट पाहिलात. तुम्हाला आनंद देण्यासाठीच याची निर्मिती केली गेली आणि मला खात्री आहे की तो आनंद तुम्हाला नक्की मिळाला असेल. ज्यांचा चित्रपट पाहायचा राहिला असेल त्यांनीही आवर्जून पहावा ही विनंतीपुन्हा एकदा दोन्ही चित्रपटांच्या संपूर्ण संघाकडून मराठी चित्रपटांवर प्रेम करणार्या तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद."
सुबोधने शेवटी लिहिलं की, " हे चित्रपट आता तुमचे झाले आहेत, सुरक्षित झाले आहेत, त्यामुळे त्याच्या पुढील प्रवासाची आम्हाला चिंता नाही. प्रेम. ज्यांनी चित्रपटातील पात्रांना सुंदर वेषभूषा दिली,त्यांनीच आम्हालाही चित्रपटाच्या प्रीमियरला सजवले. "संगीत मानापमान " च्या मुंबई प्रीमियरसाठी नचिकेत बर्वे यांनी घडवलेला हा सुंदर वेष. मनःपूर्वक धन्यवाद नचिकेत, खूप प्रेम." सुबोधचा 'संगीत मानापमान' सिनेमा सध्या नजीकच्या थिएटरमध्ये सुरु आहे.