Join us  

Video : 'मुंबईचा राजा'च्या दरबारात घुमला 'शिवबा राजं'चा आवाज, 'सुभेदार' टीमचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 6:06 PM

'सुभेदार'च्या टीमने मुंबईचा राजाच्या दरबारात 'शिवबा राजं' हे गाणं गायलं. याचा व्हिडिओ मुंबईचा राजाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. जिकडेतिकडे गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी प्रसिद्ध सार्वजनिक मंडळांना भेटी देऊन बाप्पाचं दर्शन घेत असतात. यावर्षीही सेलिब्रिटींनी मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या गणेशगल्ली मंडळातील गणरायाच्या दर्शनाला गेले होते. 

गणेशगल्लीतील गणरायाची मूर्ती हे विशेष आकर्षण असतं. यंदा गणेशगल्लीचा देखावाही खास होता. छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पुर्ण झाल्याने गणेशगल्लीत रायगडाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. गणेशगल्लीत महाराजांचा दरबार भरविण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'सुभेदार' या ऐतिहासिक मराठी चित्रपटाच्या टीमने मुंबईच्या राजाचे दर्शन घेतले. 

'सुभेदार'च्या टीमने मुंबईचा राजाच्या दरबारात 'शिवबा राजं' हे गाणं गायलं. याचा व्हिडिओ मुंबईचा राजाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत 'सुभेदार' चित्रपटातील कलाकार शिवबा राजं हे गाणं गाताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकमधील 'सुभेदार' हा पाचवा सिनेमा आहे. शूरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अजय पूरकर, चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :दिग्पाल लांजेकरगणेश गल्लीचा राजाअजय पुरकरसेलिब्रिटी गणेश