Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्या अभिनेत्रींना पुरस्कार घेताना पाहताना व्हायचा त्रास, स्नेहल तरडेंनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 11:27 IST

Snehal Tarde : अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे लग्नानंतर काही काळ सिनेइंडस्ट्रीपासून दुरावल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा त्या सिनेइंडस्ट्रीत सक्रीय झाल्या आहेत.

अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांच्या पत्नी स्नेहल तरडे (Snehal Tarde) यांना तशी परिचयाची गरज नाही. त्यादेखील उत्तम अभिनेत्री आहेत. लग्नानंतर त्या काही काळ सिनेइंडस्ट्रीपासून दुरावल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा त्या सिनेइंडस्ट्रीत सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी धर्मवीर सिनेमात साकारलेली छोटी भूमिका देखील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली.

स्नेहल तरडेंनी लग्नानंतर घेतलेल्या ब्रेकबद्दल या मुलाखतीत सांगितले. त्या म्हणाल्या की, खरेतर हा निर्णय घेतला, पण जेव्हा अंमलात आणण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्रास होऊ लागला. एकांकिका करत असताना मी ज्यांना बक्षीस घेऊ दिले नाही, त्या अभिनेत्री आज पुरस्कार घेत होत्या. त्यांना पाहताना मला त्रास व्हायचा. पण माझ्यासाठी तो त्रास दुय्यम होता. अभिनय न करण्याच्या निर्णयाचा त्रास होत होता...मात्र हा त्रास मी बाजूला ठेवला. कारण कुटुंब संस्थेवर माझा खूप विश्वास आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले की, त्रास होत नाही. कौटुंबिक काळ व्यवस्थित जबाबदारीने पार पाडली की मी निर्धास्त होणार होते हा विचार होता. संसाराची घडी आता व्यवस्थित बसली आहे. त्यामुळे आता इथून पुढे मी सुसाट काम करू शकते.

वर्कफ्रंट...स्नेहल तरडे यांच्या कामाबद्दल सांगायचे तर, त्यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘चौक’ या चित्रपटात काम केले आहे. ‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धे’तला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘माई भिडे’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. ‘बाहुबली’च्या मराठी आवृत्तीचे लेखन त्यांनी केले होते. आता त्या दिग्दर्शनातही पदार्पण करणार आहेत. 

टॅग्स :प्रवीण तरडे