Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १५ वर्षांनी येणार सिद्धार्थ जाधवच्या 'हुप्पा हुय्या'चा सीक्वल, 'हुप्पा हुय्या २'ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:33 IST

मकरसंक्रांत निमित्त सिद्धार्थने ही 'हुप्पा हुय्या २'ची घोषणा करत चाहत्यांची संक्रांत गोड केली आहे. 

सिद्धार्थ जाधव हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'जत्रा', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'दे धक्का', 'साडे माडे तीन', 'इरादा पक्का' हे सिद्धार्थचे सिनेमे प्रचंड गाजले. याच सिनेमांच्या पंगतीत बसलेला आणखी एक सुपरहिट सिनेमा म्हणजे २०१० साली प्रदर्शित झालेला ‘हुप्पा हुय्या’. या सिनेमात सिद्धार्थने मुख्य भूमिका साकारली होती. आता या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरसंक्रांत निमित्त सिद्धार्थने ही 'हुप्पा हुय्या २'ची घोषणा करत चाहत्यांची संक्रांत गोड केली आहे. 

तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरसंक्रातीनिमित्त सिनेमाची घोषणा झाली असून या सिनेमाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावरुन 'हुप्पा हुय्या २'चं पोस्टर शेअर केलं आहे. "जय हनुमान..जय बजरंगा..'हुप्पा हुय्या २' लवकरच...", असं त्याने म्हटलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन समित कक्कड करणार आहेत.

'हुप्पा हुय्या' या सिनेमाच्या पहिल्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापराने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मारुतीरायाने दिलेल्या शक्तीचा गावासाठी उपयोग करणाऱ्या हणम्याची ही गोष्ट अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे आणि हीच आठवण पुन्हा ताजी करण्यासाठी दिग्दर्शक समित कक्कड  यांचा 'हुप्पा हुय्या २' रसिक प्रेक्षकांसाठी पूर्वीपेक्षा भव्यदिव्य व स्टायलिश ट्रीटमेंटने  सज्ज होणार आहे. चित्रपटाच्या लेखनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच कलाकार आणि तंत्रज्ञांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

दिग्दर्शक समित कक्कड सिनेमाच्या सीक्वलबद्दल म्हणाले, "'हुप्पा हुय्या २' हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवेल, असा विश्वास मला आहे. आम्ही हा सिक्वेल तितक्याच उत्कटतेने आणि भव्यदिव्य पद्धतीने साकारणार आहोत".   

समित कक्कड फिल्म्स प्रस्तुत ‘हुप्पा हुय्या २’ ची निर्मिती अमर कक्कड, पुष्पा कक्कड आणि समित कक्कड हे करीत असून, संगीत-दिग्दर्शन अजित परब यांचे तर लेखन हृषिकेश कोळी यांचे आहे. ‘संकटात धैर्य, संघर्षात साहस आणि विजयात विनम्रता शिका’ अशी मारुतीरायाची शिकवण मानणाऱ्या 'हुप्पा हुय्या २'च्या घोषणेनंतर या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

टॅग्स :सिद्धार्थ जाधवमराठी अभिनेतासिनेमा