सचिन पिळगावकर हे सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली होती. केवळ मराठी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली आहे. अनेक मुलाखतींतून सचिन पिळगावकर यांनी त्यांचे शूटिंग दरम्यानचे किस्से सांगितले होते. मात्र, त्यांच्या काही वक्तव्यावरुन सिनेसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्याला ट्रोल केलं गेलं होतं. सचिन पिळगावकर यांच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच त्यांची लेक श्रिया पिळगावकर हिने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
श्रियाने नुकतीच 'महाराष्ट्र टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने वडिलांच्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, "ते सगळंच खेदजनक होतं. पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झालीय की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालंय. ट्रोलर्सना काहीच काम नसतं, म्हणून ते आम्हा कलाकारांवर टीका करतात. शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळतंय, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. सोशल मीडियावरचं जग असंच आहे, त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत. कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं, हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतलं आहे".
दरम्यान, आईवडिलांप्रमाणेच श्रियाही सिनेसृष्टीत कार्यरत आहे. श्रियाने अनेक हिंदी सिनेमा आणि वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. अलिकडेच तिची 'मंडाला मर्डर्स' ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तिचं कौतुकही होत आहे.