Join us

श्रेयश - दि किंग जेडीच्या ‘मैदान मार’ गाण्याची होतेय सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 20:21 IST

पहिला मराठी रॅपर म्हणून नावारुपास आलेल्या श्रेयशने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘किंग जेडी’ अर्थात श्रेयश जाधव नेहमीच संगीतप्रेमींसाठी नवनवीन गाण्यांचा खजिना घेऊन येतो. त्याची गाणी नेहमीच थिरकायला लावणारी आणि अनोखी असतात. पहिला मराठी रॅपर म्हणून नावारुपास आलेल्या श्रेयशने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गाण्यात वेगवेगळे प्रयोग करणारा श्रेयश आता ‘मैदान मार' हे जोशपूर्ण गाणे घेऊन आला आहे. 

मैदान मार हे गाणे शौर्य आणि देशभक्तीवर आधारित असून तरुणांसाठी प्रेरणा देणारे आहे. महाराष्ट्राला शौर्याचा खूप मोठा इतिहास आहे. स्वराज्याची पहिली ठिणगी ही महाराष्ट्रातच पडली. या गाण्यात श्रेयश आपल्याला सैनिकी तसेच मर्द मावळ्याच्या वेशात दिसत आहे. जवानाच्या वेशात तो अतिरेक्यांशी सामना करत आहे तर शिवरायांच्या मावळ्याच्या वेषात तो लढवय्येपणाची शिकवण देत आहे.  जवान आणि शिवरायांचा मावळा या दोघांतही आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी काहीही करण्याची हिम्मत असल्याचे या गाण्यातून अधोरेखित होत आहे.

श्रेयशच्या दमदार आवाजातील या गाण्याला हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर या त्रिनीती ब्रदर्सनी संगीत दिले आहे. या गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन, त्रिनीती ब्रदर्स आणि श्रेयशचे असून गाण्याच्या दिग्दर्शनाची आणि छायाचित्रीकरणाची धुरा मनीष भट याने सांभाळली आहे.
टॅग्स :श्रेयश जाधव