शाळा आणि शिक्षणाचा मुद्दा सध्या अनेक पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. वाढत्या फी आणि अवाढव्य खर्चांमुळे पालक त्रस्त आहेतच, पण त्यासोबतच पारंपरिक शिक्षणामुळे मुलांवर येणारा मानसिक ताण आणि त्यांचा खरा कल कशाकडे आहे, हे न समजणे यांसारख्या समस्याही समोर येत आहेत. अशा परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी आपल्या मुलांसाठी वेगळे निर्णय घेतलेले पाहायला मिळतात. कोणी नेहमीपेक्षा वेगळ्या शाळांची निवड करत आहेत, तर कोणी थेट 'होमस्कूलिंग'चा (घरीच शिक्षण देण्याचा) पर्याय स्वीकारत आहेत. याच वाटेवर आता अभिनेता शंतनू गंगणे यानेही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शंतून गंगणेनं आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाबद्दल अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यानं लिहलं, "आमच्या कुटुंबासाठी एक नवीन अध्याय सुरू होत आहे. आम्ही पारंपरिक शिक्षण पद्धतीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमच्या मुलांचा प्रवास घरातून शिक्षण (Homeschooling) देत करत आहोत, जेथे शाळेच्या फीऐवजी आम्ही खऱ्या आयुष्यातील अनुभवांमध्ये, प्रवासात आणि एकत्र शिकण्यात गुंतवणूक करणार आहोत". शंतनूच्या पोस्टवर चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिलाय. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शंतनू त्याची पत्नी कांचन यांनी घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद असल्याचं अनेकांनी म्हटलंय.
शंतनू गंगणेनं सुभाष घई निर्मित व राजीव पाटील दिग्दर्शित 'सनई चौघडे' चित्रपटात लहानशा भूमिकेद्वारे शंतनूचे रूपेरी पडद्यावर आगमन केलं होतं. 'वंशवेल' चित्रपटात त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली. तसेच 'तुह्या धर्म कोंचा', 'आभरान' 'संदूक', 'बावरे प्रेम हे', 'धुरंदर भाटवडेकर', 'रिंगण' या चित्रपटात शंतनू सहाय्यक भूमिकेत झळकला आहे. तर अलिकडेच तो 'पारू' मालिकेत झळकला.