Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रयतेच्या आनंदोत्सवाचं ते गाणं होतं.."; 'छावा'मधील 'लेझीम सीन'मागची खरी गोष्ट संतोषने उलगडली

By देवेंद्र जाधव | Updated: March 1, 2025 13:53 IST

'छावा' मधील लेझीम दृश्याचं शूटिंग करण्यात आलं तेव्हा त्यामागची कहाणी काय होती याचा खुलासा संतोषने केलाय. जो वाचून सर्वांना महत्वाची जाणीव होईल (chhaava)

'छावा' सिनेमाचा (chhaava) ट्रेलर रिलीज झाला अन् शिवप्रेमींनी छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळून नृत्य करतानाच्या दृश्यावर आक्षेप नोंदवला. परिणामी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी (laxman utekar) हा सीन 'छावा'मधून काढून टाकला. या सीनमागची कहाणी 'छावा'मध्ये भूमिका साकारणाऱ्या संतोष जुवेकरने (santosh juvekar) न्यूज १८ लोकमतच्या मुलाखतीत सांगितली. संतोष म्हणाला की, "बुऱ्हाणपूरची लढाई झाल्यावर महाराज आपलं सैन्य आणि सहकाऱ्यांसोबत पुन्हा रायगडावर येतात. तेव्हा महाराजांचं औक्षण केलं जातं."

"येसुबाई आणि धाराऊ त्यांना ओवाळून रयतेकडून राजांचं स्वागत केलं जातं. त्या आनंदोत्सवाचं ते गाणं आहे. त्या गाण्यात लेझीम हा आपला पारंपरिक सांस्कृतिक खेळ खेळला जातोय. तिथे एक-दोन मावळे राजांजवळ जाऊन त्यांच्यासमोर लेझीम धरतात अन् त्यांना खेळण्याचा आग्रह करतात. असं त्या गाण्यात होतं. महाराजांकडे ती लेझीम येते. आम्ही सर्व मावळे बाजूला उभे असतो. महाराज येसूबाईंकडे बघतात. पुढे मग महाराज आणि येसूबाई लेझीमचे तीन-चार डाव खेळतात."

"आम्ही चार ते पाच दिवस ते गाणं शूट केलं. मला अजूनही आठवतंय गाण्याच्या पहिल्या दिवशी जे आमचे नृत्यदिग्दर्शक होते त्यांना लक्ष्मण सरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, मुझे सिर्फ लेझीम चाहिए. कोई स्टेप या डान्स नही! मुझे डान्स मैं भी शेर चाहिए. लेझीम खेळताना सुद्धा तो आनंद हा वाघाचा आनंद वाटला पाहिजे. तिथे कुठेही हिरो दिसता कामा नये, इतके स्पष्ट विचार होते सरांचे."

"दरवेळेस शूटिंग करताना लक्ष्मण सरांना काही वेगळं वाटलं की, तरी ते थांबायचे. कारण त्यांना फक्त लेझीम हवी होती. हिरो-हिरोईन आणि साईड डान्सर असं त्यांना काही नको होतं. ही सगळी रयत आनंदोत्सव साजरा करतेय आणि हे महाराज आहेत. इतकं सुंदर गाणं कोणीतरी आधी पाहिलं असतं तर आज ते गाणं असतं. एखाद्या छोट्याश्या क्लीपवरुन महाराज असे नाचू कसे शकतात असे प्रश्न समोर आले. का? आता आपण बघतो की अनेक पक्षांचे नेते निवडून येतात. त्यांचे कार्यकर्ते ढोल-ताशे घेऊन जल्लोष करत नाचतात. तेव्हा कार्यकर्ते नेत्याला बोलावतात. कार्यकर्त्यासोबत नेतेही थोडंसं नाचतात ना हात वर करुन. मग माझे राजे दोन डाव खेळले असतील ना!"  

टॅग्स :संतोष जुवेकर'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदाना