सचिन पिळगावकर हे सिनेसृष्टीतील महागुरू आहेत. अगदी बालवयापासूनच त्यांनी अभिनय क्षेत्रात करियर करण्यास सुरुवात केली होती. पिळगावकरांचे किस्से कायमच चर्चेत असतात. सचिन पिळगावकर एक उत्तम नट तर आहेत. पण एखाद्याने चांगलं काम केलं तर भरभरुन कौतुक करण्याचा मनाचा मोठेपणाही त्याच्यांकडे आहे. एकापेक्षा एक या शोमध्ये सचिन पिळगावकर एखाद्या कलाकाराचा डान्स आवडला की भरभरुन बोलायचे. एवढंच नव्हे तर १०० रुपयाची नोटही ते त्यांच्या खिशातून काढून द्यायचे. याबद्दल त्यांना मुलाखतीत विचारण्यात आलं होतं.
रेडिओ मिरचीला दिलेल्या मुलाखतीत सचिनजी म्हणाले होते की "मला चांगलं सगळ्यात आधी दिसतं. याच्याकरता प्रॅक्टिस वगैरे केलेली नाही. हे उपजत आहे. जे दिसतं ते मी बोलतो. मला कौतुक करावंसं वाटलं तर मी ते करतो. कोणाला मनापासून पाहून आदर वाटला, त्याचे पाय धरावेसे वाटले तर मी धरतो. हे मी माझ्या गुरुंकडून शिकलो आहे. जेव्हा जेव्हा मी चांगला डान्स करायचो किंवा चांगला शॉट द्यायचो. तेव्हा मला माझ्या कोरिओग्राफरकडून किंवा दिग्दर्शकाकडून एक रुपया मिळायचा. त्या रुपयाचं मला अप्रूप राहिलेलं आहे. त्याचे मग १० रुपये झाले. १० रुपये मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट".
"जेव्हा मी एकापेक्षा एक करायचो तेव्हा ते १० रुपये १०० रुपयांइतके झाले होते. सगळ्यांनी ते १०० रुपये जपून ठेवले आहेत. काहींनी त्याच्या फ्रेम्स बनवल्यात. काही जण त्यावर माझ्या सह्याही घ्यायची. आणि ही प्रथा मी अजूनही सुरू ठेवलीये. जर मला कोणाचं काम आवडलं तर मी १०० रुपये देतो. खर्च करू नकोस पण तुझ्याकडे ठेव", असंही ते म्हणाले.