Rinku Rajguru On Her Crush: 'सैराट' चित्रपटातील अर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड लोकप्रिय आहे. रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या प्रत्येक हालचालीकडे त्यांचे लक्ष लागलेले असते.'सैराट'मधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली आणि आता आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सतत चर्चेत असते. नुकतीच तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या ‘क्रश’बद्दल आणि भविष्यातील करिअरच्या योजनांबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. रिंकूने दिलेली ही उत्तरे सध्या तिच्या चाहत्यांसाठी आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहेत.
रिंकूनं 'सकाळ प्रिमिअर'ला मुलाखतीत तिच्या क्रशबद्दल सांगितलं. मुलाखतीत तिला विचारले की तुझा क्रश कोण आहे, ज्याच्याबरोबर तुला काम करण्याची इच्छा आहे? यावर रिंकूनं कोणा एका अभिनेत्याचे नाव घेण्याऐवजी अनेक कलाकारांची नावे घेतली. ती म्हणाली, "मला एका कोणाचं नाव सांगता येणार नाही, कारण मला खूप लोक आवडतात. मला विक्रांत मेस्सी, विकी कौशल, आणि कमल हसन या सगळ्यांचं काम खूप आवडतं"
यासोबतच तिने पुढे सांगितले की, तिला केवळ एका अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा नाही, तर तिला ज्यांचे काम चांगले आहे अशा सगळ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळावी अशी तिची इच्छा आहे. ती म्हणाली, "मला असं वाटतं की स्मिता पाटील आणि श्रीदेवी यांच्यासारखं काम केलं पाहिजे. आपल्या मराठी इंडस्ट्रीतही खूप चांगले नट आहेत. मला सगळ्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करायचं आहे".
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, नुकतीच ती सुबोध भावे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत 'बेटर हाफची लव्हस्टोरी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता आगामी काळात रिंकू कोणत्या नवीन आणि हटके भूमिकेतून प्रेक्षकांना प्रभावित करते, हे पाहणे तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरेल. आतापर्यंत रिंकूनं 'झिम्मा २', 'झुंड', 'कागर' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची छाप सोडली आहे