Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिमा लागू यांच्या आईने या सिनेमात चक्क केली होती अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 07:00 IST

फार कमी लोकांना माहित आहे की, रिमा लागू यांच्या आईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. १८ मे, २०१७ मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अनेकांना धक्का बसला होता. फार कमी लोकांना माहित आहे की, रिमा लागू यांच्या आईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्रीत आईच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचे लग्ना अगोदरचे नाव नयन भडभडे असे होते. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावातील कमळाबाई शाळेमध्ये झाले. बालपणापासूनच अभिनयाची आवड असली तरी शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या आईने त्यांना या कला क्षेत्रापासून दूर राहावे म्हणून पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठवले होते. पुण्यात आंतरशालेय नाट्यस्पर्धा मधून त्यांची अभिनयाची गोडी आणखीनच वाढत गेली. शिक्षण पूर्ण करून त्या बँकेत नोकरी करू लागल्या परंतु त्यांच्यातील कलाकार त्यांना शांत बसू देत नव्हता. अभिनयाला वेळ देता यावा यासाठी बँकेतील नोकरीला त्यांनी सोडण्याचे ठरवले. मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेते विवेक लागू यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्यानंतर रिमा लागू याच नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. अभिनयाचा त्यांचा हा प्रवास व्यावसायिक नाटक, मराठी, हिंदी चित्रपट अशी यशाची शिखरे गाठत होता. मैने प्यार किया, कुछ कुछ होता है, दिवाने, दिल्लगी, येस बॉस, हम साथ साथ है अशा अनेक चित्रपटातून बॉलिवूडमधील मॉडर्न आई उदयास आली होती. १८ मे, २०१७ मध्ये रिमा लागू यांचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या या अनपेक्षित निधनाच्या बातमीने बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

रिमा लागू यांच्या आई मंदाकिनी भडभडे या देखील मराठी नाट्य तसेच चित्रपट अभिनेत्री होत्या. अशोक सराफांसोबत त्यांनी अरे संसार संसार या चित्रपटात त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती आणि मुलगी रीमा देखील या चित्रपटात होत्या.. माय लेकीची जोडी असलेला हा त्यांचा पहिला चित्रपट होता. अपराध, वाट चुकलेले नवरे, अन्नपूर्णा, नवरे सगळे गाढव, मुंबईचा फौजदार अशा अनेक मराठी चित्रपट तसेच भटाला दिली ओसरी, सौजन्याची ऐशी तैशी, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकात त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या. १९४९ च्या सुमारास त्यांनी क्राईम ब्रांच कार्यालयात काही काळ नोकरी देखील केली होती. मंदाकिनी भडभडे यांचेही वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयाच्या विकाराने निधन झाले होते.  

टॅग्स :रिमा लागूअशोक सराफ