‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महाकाव्य चित्रपटातील दुसरे गाणे ‘जय शिवराय’ नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पहिल्या गाण्याच्या यशानंतर, या नव्या गीताने चित्रपटाच्या संगीत प्रवासाला अधिक व्यापक स्वरुप प्राप्त झालं आहे. अजय-अतुलच्या संगीताने आणि या नव्या गाण्याने ‘राजा शिवाजी’च्या संगीताला एक वेगळीच उंची प्राप्त करुन दिली आहे.
प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले ‘जय शिवराय’ हे गाणे केवळ एक पारंपरिक प्रेरणागीत नसून, तो एक प्रभावी आहे. दमदार स्वरांनी सजलेल्या या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासातील संघर्ष, निर्धार आणि उदयाची कहाणी अत्यंत प्रभावीपणे उलगडली आहे. या संगीत रचनेत ऊर्जा आणि भावनिक खोली असून हे गाणं ऐकून अंगावर काटा निर्माण होतो.
सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावलेल्या एका विचाराची, एका संघर्षाची आणि पुढे एका साम्राज्याच्या उभारणीची ही संगीतात्मक अभिव्यक्ती आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या एका नेतृत्वाच्या जन्माचे प्रतीक म्हणून हे गीत उभे राहते, जे इतिहासातील एका महान पर्वाची जाणीव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.
अजय-अतुल यांनी या गाण्यात पारंपरिक मराठी संगीताची मुळे जपत आधुनिक सिनेमॅटिक संगीताचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. त्यामुळे ‘जय शिवराय’ हे गीत केवळ श्रवणीय नसून प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव देते. या गाण्यामुळे चित्रपटाच्या कथानकाला गती मिळेल आणि प्रेक्षकांमध्ये एक भावनिक ऊर्जा निर्माण करते.
‘राजा शिवाजी’ या भव्य चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित आणि अनुभवी कलाकारांचा सहभाग आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या कलाकारांनी या ऐतिहासिक कथानकाला आपला भव्य कलात्मक आधार दिला आहे. विशेष म्हणजे रितेश देशमुखने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख यांच्या निर्मितीत साकारला असून, १ मे २०२६ रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी, हिंदी आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : The second song 'Jai Shivray' from the movie 'Raja Shivaji' is out. Composed by Ajay-Atul, the song narrates the saga of Shivaji Maharaj's life with powerful music. The film releases on May 1, 2026.
Web Summary : फिल्म 'राजा शिवाजी' का दूसरा गाना 'जय शिवराय' रिलीज हो गया है। अजय-अतुल द्वारा रचित, यह गाना शक्तिशाली संगीत के साथ शिवाजी महाराज के जीवन की गाथा सुनाता है। फिल्म 1 मई, 2026 को रिलीज होगी।