Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल वैद्य आणि केतकी माटेगावकर का म्हणतायेत ‘साथ दे तू मला’? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 17:50 IST

‘साथ दे तू मला’ या मालिकेची गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटेल. प्राजक्ताला तिची स्वप्न पूर्ण करण्यात कशी आणि कुणाकुणाची साथ मिळणार याची रंगतदार गोष्ट ‘साथ दे तू मला’ मधून उलगडेल.

तरुणाईला आपल्या अवीट सुरांनी मोहून टाकणाऱ्या गायकांपैकी आघाडीचं नाव म्हणजे केतकी माटेगावकर आणि  राहुल वैद्य. स्टार प्रवाह वाहिनीवर ११ मार्चपासून सुरु होणाऱ्या ‘साथ दे तू मला’ या मालिकेचं टायटल ट्रॅक राहुल आणि केतकीच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलंय. सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीरने या गाण्याला संगीत दिलं असून गीतकार श्रीपाद जोशीच्या लेखणीतून हे गाणं साकारलंय.

या टायटल ट्रॅकविषयी सांगताना केतकी म्हणाली, ‘साथ दे तू मला मालिकेच्या निमित्ताने खूप सुंदर टायटल ट्रॅक गाण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. राहुल वैद्यसोबत हे गाणं गाताना खुपच मजा आली. गाण्याचे शब्द खूप सुंदर आहेत आणि निलेश मोहरीर यांनी अप्रतिम म्युझिक दिलं आहे. हे टायटल ट्रॅक ऐकल्यानंतर ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होत रहाते. माझ्या आजवरच्या गाण्यांपैकी हे खुपच स्पेशल गाणं आहे. प्रेक्षकांच्या मनावर हे गाणं नक्कीच रुंजी घालेल याची मला खात्री आहे.’ अशी भावना केतकी माटेगावकरने व्यक्त केली.

राहुल वैद्य या गाण्याविषयी म्हणाला, एखादी चाल जशी मनात घर करुन जाते तसंच काहीसं या गाण्याच्या बाबतीत म्हणता येईल. मला स्वत:ला हे गाणं खूप आवडलं आहे. स्टार प्रवाहसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे बंध घट्ट झाले आहेत.

‘साथ दे तू मला’ ही गोष्ट आहे प्राजक्ताच्या स्वप्नांची. फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा असणाऱ्या प्राजक्ताला आपल्या क्षेत्रात खूप नाव कमवायचंय अगदी लग्नानंतरसुद्धा. करिअरसाठी सबकुछ कुर्बान असं मानणाऱ्यातली ती नाही. घर-संसार सांभाळून तिला तिच्या स्वप्नांना गवसणी घालायची आहे. खरतर घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत कुशलरित्या सांभाळणाऱ्या तमाम स्त्रियांचं प्राजक्ता प्रतिनिधित्व करते आणि म्हणूनच ‘साथ दे तू मला’ या मालिकेची गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटेल. प्राजक्ताला तिची स्वप्न पूर्ण करण्यात कशी आणि कुणाकुणाची साथ मिळणार याची रंगतदार गोष्ट ‘साथ दे तू मला’ मधून उलगडेल.

आशुतोष कुलकर्णी, प्रियांका तेंडोलकर, सविता प्रभुणे, अरुण नलावडे, मेघना वैद्य, रोहन गुजर, प्रिया मराठे, पियुष रानडे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. 

टॅग्स :केतकी माटेगावकर