Join us

"मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीबों का खाना" म्हणणाऱ्या अग्निहोत्रींवर भडकला पुष्कर, म्हणाला- "एवढी गरीबी आहे म्हणूनच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:23 IST

"मराठी माणसाचं वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण" असं करणाऱ्या विवेक अग्निहोत्रींना पुष्कर जोगने सुनावलं.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक असलेले विवेक अग्निहोत्री यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्रीयन पदार्थांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी "मराठी माणसाचं वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण" असं वक्तव्य केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी विवेक अग्निहोत्रींवर संताप व्यक्त केला आहे. काही मराठी कलाकारांनी अग्निहोत्रींच्या या वक्तव्याचा निषेध करत पोस्ट शेअर केल्या आहेत. मराठी अभिनेता पुष्कर जोगही अग्निहोत्रींच्या या वक्तव्यानंतर भडकला आहे. 

पुष्करने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन स्टोरी शेअर करत अग्निहोत्रींना चांगलंच सुनावलं आहे. "सगळे महाराष्ट्रात येतात. छान काम करतात, पैसे कमावतात... पण मराठीला तो मान देत नाहीत, याचं वाईट वाटतं. ह्यावर कोणी काही बोलतही नाही. अजून पुढच्या १०-१२ वर्षात मराठी माणसाचं अस्तित्व राहील का? याची भीती वाटते. या कमेंटचा जाहीर निषेध. एवढी गरीबी आहे म्हणूनच अख्ख्या देशाता भार मुंबई आणि महाराष्ट्राने उचलला आहे... असो जोग बोलणार", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते विवेक अग्निहोत्री? 

एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री त्यांची मराठमोळी पत्नी पल्लवी जोशीसोबत सहभागी झाले होते. या मुलाखतीत त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीबद्दल भाष्य केलं. पल्लवीने लग्नानंतर करून दिलेल्या वरण-भात आणि कढीला त्यांनी नावं ठेवली होती. हे सांगताना ते म्हणाले होते की मला वाटलेलं मराठी जेवण म्हणजे मस्त तूप वगैरे घालून असेल. पण, हे तर शेतकऱ्यांसारखं गरीब खाणं झालं. 

टॅग्स :विवेक रंजन अग्निहोत्रीपुष्कर जोगसेलिब्रिटी