Join us

Dharmaveer 2 : ठरलं! ‘धर्मवीर 2’ येणार, चित्रपटाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 14:20 IST

Dharmaveer 2 : मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक याची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा आला तसा तुफान गाजला. इतका की वर्षभरानंतरही या सिनेमाची क्रेझ कायम आहे.

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’  (Dharmaveer- Mukkam Post Thane) हा सिनेमा आला तसा तुफान गाजला. इतका की वर्षभरानंतरही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमातील प्रसादच्या लुकची, त्याच्या अप्रतिम अभिनयाची आणि चित्रपटातील त्याच्या संवादांची चर्चा आजही होताना दिसते. नुकताच ‘धर्मवीर’  चित्रपटाचा नुकताच वर्षपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. २७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत येथे ‘धर्मवीर’ च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती, त्या दरम्यान तिथे उभारण्यात आलेल्या जुन्या आनंदआश्रम प्रतिकृतीच्या सेटवर हा कार्यक्रम पार पडला. याचवेळी एक मोठी घोषणाही करण्यात आली. होय, ‘धर्मवीर 2’ची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.

धर्मवीरांच्या खूप गोष्टी बाकी आहेत, अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे 2024 मध्ये  ‘धर्मवीर 2’ घेऊन येत आहोत, अशी अशी घोषणा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी यावेळी केली. चित्रपटात धर्मवीरांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक यावेळी हजर होता.  

 धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून तो एक खंड आहे. पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल!  यावर मंगेश देसाई यांनी सांगितलं की, ‘धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अनेक पैलू अद्याप गुलद्त्यातच आहेत, जे लोकांपर्यत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागात त्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

‘धर्मवीर 2’ या चित्रपटातही प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे.    

टॅग्स :प्रसाद ओक मराठी चित्रपटमराठी अभिनेता