उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (Priya Bapat) यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून ही गोड जोडी, सर्वांची आवडती जोडी १२ वर्षांची मोठ्या पडद्यावर एकत्र आली आहे. दोघांचेही चाहते सिनेमाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपच्या पलीकडे नात्यांचं महत्व सांगणारा हा सिनेमा आहे. दरम्यान या सिनेमासाठी जर मला एकटीला ऑफर मिळाली असती आणि उमेशला मिळाली नसती तर मी हा सिनेमा केला नसता असं प्रिया बापट म्हणाली. तिने यामागचं कारणही सांगितलं.
'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बापट म्हणाली, "२०१८ मध्ये मी आम्ही दोघी सिनेमा केला. नंतर मराठी सिनेमा केलाच नाही. फार मोजके सिनेमे माझ्याकडे आले पण ते एवढे चांगले नव्हते. त्यामुळे मला कायम ही खंत राहिली होती की इतकं सातत्याने चांगलं काम करुनही इतक्या कमी स्क्रिप्ट्स का येतात? मी खूप बारकाईने निवड करते किंवा मी हिंदीतच काम करते असं माझ्याबद्दल पसरलं होतं. पण ते तसं काहीही नव्हतं. २०१८ पासून मी हिंदीत काम करायला लागले. पण त्यानंतर आम्ही 'आणि काय हवं' सीरिज केली. मराठी नाटकाची निर्मिती केली आणि आता तर मी मराठी नाटकात कामही करत आहे. पण आता कोणता तरी मराठी सिनेमा करायचा म्हणून तो करायचा नव्हता. मी असा मार्ग निवडत नाही. योग्य स्क्रिप्टची मी वाट पाहत होते."
ती पुढे म्हणाली, "बिन लग्नाची गोष्ट च्या निमित्ताने तो योग जुळून आला. हे स्क्रिप्ट मला उमेशच्या व्यतिरिक्त जर विचारलं गेलं असतं तर मी केलं नसतं. कारण काही गोष्टींचं अखंडत्व जपायला लागतं. लिव्ह इन रिलेशनशिपमधलं प्रेग्नंट असलेलं जोडपं हे जेव्हा तुम्हाला लोकांना पटवून द्यायचं आहे तेव्हा तुम्हाला अशी माणसं पाहिजे ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून, त्यांची इमेज बघून प्रेक्षक त्या माणसांवर विश्वास ठेवेल. मलाही सिनेमा करताना हे पटत होतं की हा सिनेमा एक तर वेगळ्या जोडीने करायला पाहिजे किंवा मग तो आम्हीच जोडीने केला पाहिजे. या कथानकासाठी मी कोणा दुसऱ्या अभिनेत्यासोबत किंवा उमेश कोणा दुसऱ्या अभिनेत्रीसोबत असता तर ते वर्क झालं नसतं."