मालिका, सिनेमा, नाटक आणि वेब सीरिज अशा सर्वच माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी प्रिया बापट मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रियाने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आणि कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. 'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमातून प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लिव्ह इनच्या नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. खरं तर हा प्रियाचा 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमातील व्हिडीओ आहे. या सिनेमात प्रिया रुतिका हे पात्र साकारत आहे. 'बिन लग्नाची गोष्ट'मध्ये प्रिया प्रेग्नंट असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून प्रिया खरंच गरोदर असल्याचं चाहत्यांना वाटलं. त्यामुळेच तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करण्यासोबतच शुभेच्छाही दिल्या आहेत.
"आता तुम्हाला वाटेल की खरंच प्रेग्नंट व्हावं", "मला माहीत नव्हतं की हे सिनेमाचं प्रमोशन आहे. पण तुला असं बघून छान वाटलं", "जुळे होणार नक्की आहे", "काळजी घे आणि ऑल द बेस्ट" अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. दरम्यान, 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे. आदित्य इंगळे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.