प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि लाडकं कपल आहे. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणूनही पाहिलं जातं. प्रिया आणि उमेश यांनी एकत्र अनेक नाटक आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. पण, सिनेमात ते एकत्र कपल म्हणून दिसले नव्हते. आता इतक्या वर्षांनी उमेश आणि प्रिया 'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
प्रियाने उमेशसोबतचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. "चेहऱ्यावर हास्य आणि आनंद आहे कारण आमचा सिनेमा उद्या प्रदर्शित होत आहे. आजपर्यंत तुम्ही आम्हा दोघांवर खरंच खूऽऽऽप प्रेम केलंत. आज १२ वर्षांनी मराठी चित्रपटात एकत्र आलो आहोत. एक emotional, प्रेमळ आणि भावपूर्ण कथा आहे. 'बिन लग्नाची गोष्ट' चित्रपट येतोय उद्यापासून. तुमचं प्रेम जे आम्ही नाट्यगृहात अनुभवतो ते इथेही मिळेल अशी आशा करतो", असं या पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे.
'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमातून प्रिया आणि उमेश ऑनस्क्रीन कपल म्हणून भेटीला येत आहेत. या सिनेमात निवेदिता सराफ आणि गिरीष ओक यांच्याही मुख्य भूमिका आहेत. आदित्य इंगळे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. १२ सप्टेंबरपासून हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.