Pravin Tarde on Ye Re Ye Re Paisa 3: 'येरे येरे पैसा' या चित्रपटाचे आजवर दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यावर या बहुचर्चित कॉमेडी चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शुक्रवारी १८ जुलै रोजी 'येरे येरे पैसा ३' प्रदर्शित झाला आहे. सिनेमा पाहिल्यावर लोकप्रिय अभिनेता प्रवीण तरडे यांनी या सिनेमासाठी आणि दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. "मराठीत पण व्यावसायिक सिनेमा बनू शकतो" असं म्हणत त्यांनी चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं.
प्रवीण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दिग्दर्शन शैलीचं कौतुक केलं. पोस्टमध्ये त्यांनी लिहलं, "मराठीत पण व्यावसायिक सिनेमा बनू शकतो. संजय जाधव म्हणजे दोस्तांच्या दुनियादारीतील मूळ पुरूष त्याचा सिनेमा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. 'येरे येरे पैसा ३' हा अत्यंत वेगवान पटकथा असलेला सिनेमा, खतरनाक दिग्दर्शनातून साकारलाय… भव्यतेच्या बाबतीत सुधीर कोलते, ओमकार माने, अमेय खोपकर आणि इतर निर्मात्यांनी मराठी सिनेमाला निर्मितीच्या क्षेत्रात दोन पावलं पुढं नेलंय".
प्रवीण यांनी सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामत यांच्या अभिनयाची विशेष प्रशंसा केली. पोस्टमध्ये पुढे लिहलं, "अभिनयाची मांदियाळीही कमाल जमून आलीये. सिध्दार्थ जाधव आणि उमेश कामत दोघं अभिनयाच्या ताकदीवर सिनेमात भाव खावून जातात. संजय नार्वेकर आणि तेजस्विनी पंडित सलग तीन भागात तशीच अप्रतिम बॅटिंग करताहेत. नागेश भोसले, जयवंत वाडकर, वनिता खरात, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे तुम्ही सगळे कमाल आहात आणि शेवटी शेवटी आलेला ईशान खोपकर तुझी एनर्जी जबरदस्त आहे. संजय जाधव आणि टीमला खूप शुभेच्छा". प्रवीण तरडे यांनी पोस्टच्या शेवटी 'येरे येरे पैसा ३' नक्की पाहा' असं आवाहन केलं.
दरम्यान, प्रवीण तरडे यांच्या पोस्टवर तेजस्विनी पंडितने, 'प्रवीण दादा खूप खूप धन्यवाद' अशी कमेंट केली आहे. तर उमेश कामतनं "मनापासून आभार" अशी प्रतिक्रिया पोस्ट वाचून दिली आहे. दरम्यान, 'येरे येरे पैसा' चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर २०१९ मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. आता जवळपास ६ वर्षांनी या सिनेमाचा तिसरा भाग १८ जुलैला प्रदर्शित झाला आहे.