Join us

'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 11:20 IST

एका अमराठी प्रेक्षकाचा व्हिडीओ समोर आला आहे. दशावतार पाहून भारावून गेलेल्या या प्रेक्षकाने थिएटरमध्येच दिलीप प्रभावळकरांना कडक सॅल्यूट ठोकला आहे. 

Dashavtar: ज्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो 'दशावतार' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय. कोकणातील परंपरा आणि संस्कृतीची झालर असलेल्या 'दशावतार' सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळतंय. केवळ मराठीच नव्हे तर कित्येक अमराठी प्रेक्षकांची मनंही 'दशावतार'ने जिंकली आहेत. त्यामुळेच प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. अशाच एका अमराठी प्रेक्षकाचा व्हिडीओ समोर आला आहे. दशावतार पाहून भारावून गेलेल्या या प्रेक्षकाने थिएटरमध्येच दिलीप प्रभावळकरांना कडक सॅल्यूट ठोकला आहे. 

'दशावतार' सिनेमातून दिलीप प्रभावळकरांनी पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाच्या ताकदीचं दर्शन घडवलं आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर अमराठी प्रेक्षकाने दिलीप प्रभावळकरांचं कौतुक केलं आहे. एवढंच नव्हे तर थिएटरमध्ये सगळ्यांसमोरच अभिनेत्याला या प्रेक्षकाने स्टँडिंग ओव्हेशन दिली आहे. दिलीप प्रभावकरांचा अभिनय पाहून हा अमराठी प्रेक्षक इतका भारावून गेला की अभिनेत्याबद्दल बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. 'दशावतार' सिनेमाच्या अकाऊंटवरुन थिएटरमधील प्रेक्षकाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडीओत तो प्रेक्षक म्हणतो, "मी अमराठी आहे. पण हा सिनेमा पाहण्यासाठी मी जुहूवरुन आलो आहे. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की दिलीप प्रभावळकर सर हे एक उत्कृष्ट अभिनेते आहेत. मी त्यांना सलाम करतो. आम्हाला मराठी सिनेमा आवडतो आणि आमचं तुमच्या सगळ्यांवर प्रेम आहे. मी एक स्टँडिंग ओव्हेशन देतो". त्यानंतर प्रेक्षक थिएटरमध्येच सीटवर उभं राहून जोरजोरात टाळ्या वाजवत असल्याचं दिसत आहे.

'दशावतार'ने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. १२ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तीनच दिवसांत तब्बल ४.३७ कोटींची कमाई केली आहे. दिलीप प्रभावकरांसोबत या सिनेमात भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, विनोद तावडे अशी या स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :दिलीप प्रभावळकर सिनेमा