Neet Ug 2026 Exam Cancellation : देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारी NEET-UG २०२६ ही परीक्षा अखेर रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १० मे २०२६ रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करून ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे आता देशभरातील विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात आला आहे. नीट परीक्षेच्या गोंधळावर देशभरातून संताप व्यक्त होतोय. यावर प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर केलेली एक खोचक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अतुल कुलकर्णींनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर परीक्षेचे नाव न घेता उपरोधिक प्रश्न विचारले आहेत.
"फुटलेल्या पेपरमधले न सोडवलेले प्रश्न. गाळलेल्या जागा भरा.
१- बोले तैसा 'नं' चाले त्याची... पाऊले.
अ- वंदावी
ब-पूजावी
क-ओळखावी
२- अति शहाणा त्याचा... रिकामा
अ-बैल
ब-रेडा
क-पिप
३- चकाकतं ते सगळंच …….नसतं
अ- ….
ब-….
क-….
४- गरज सरो ….. मरो
अ- वैद्य
ब- सोनार
क- मतदार
५- आंधळं दळतंय …….पीठ खातंय
अ- कुत्रं
ब- A1
क- A2
६- असंगाशी संग आणि …….गाठ
अ- खिशाशी
ब- प्राणाशी
क- दोन्ही
अतुल कुलकर्णी यांनी या पोस्टच्या माध्यमातून परीक्षेच्या व्यवस्थेवर आणि पेपरफुटीवर बोचरी टीका केली आहे.
फेरपरीक्षेबाबत महत्त्वाची माहिती
'NEET (UG)' ही पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (NTA) द्वारे घेतली जाणारी एक राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आहे. रद्द झालेली ही परीक्षा आता पुन्हा नव्याने घेतली जाईल. या पुनर्परीक्षेच्या तारखा लवकरच अधिकृतपणे जाहीर केल्या जातील. भारतातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ही परीक्षा पार पडली होती. परीक्षा रद्द झाल्याचे वृत्त समजताच दिल्लीसह देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलने सुरू केली आहेत. 'नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया'च्या (NSUI) कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकार आणि NTA विरोधात घोषणाबाजी केली.
Web Summary : The NEET-UG 2026 exam cancellation sparks outrage. Atul Kulkarni criticizes the paper leak with satirical fill-in-the-blanks. Re-exam dates to be announced; CBI investigates. Students protest nationwide.
Web Summary : नीट-यूजी 2026 परीक्षा रद्द होने पर आक्रोश। अतुल कुलकर्णी ने व्यंग्यात्मक रूप से पेपर लीक की आलोचना की। पुन: परीक्षा की तारीखें जल्द घोषित होंगी; सीबीआई जांच करेगी। छात्रों का राष्ट्रव्यापी विरोध।