नागराज मंजुळेंच्या 'सैराट' चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याची हृदयस्पर्शी प्रेमकथा प्रेक्षकांना भावली होती. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं. आता ९ वर्षांनी पुन्हा हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता 'सैराट'च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, "आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केले होते. सैराटने महाराष्ट्रातच नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळतेय. याहून आनंद काय असू शकतो? यासाठी मी झी स्टुडिओजला मनापासून धन्यवाद देतो. चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल , याची मला खात्री आहे."
रिंकू राजगुरू म्हणते, “सैराट हा चित्रपट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आर्ची या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाने मला फक्त ओळख नाही तर प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा दिली. ‘ सैराट’ पुन्हा प्रदर्शित होतोय याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांची कायम आभारी असेन.”
आकाश ठोसर म्हणतो, “ ‘सैराट’ हा माझ्या करिअरचा पहिला आणि आजवरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. परश्या या व्यक्तिरेखेने मला प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख दिली. सैराटच्या माध्यमातून आमच्या टीमने जे यश मिळवले, ते आजही आठवणीत आहे. सैराटचे पुनर्प्रदर्शन होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मला खात्री आहे, की प्रेक्षक पुन्हा एकदा या चित्रपटाला तितक्याच प्रेमाने स्वीकारतील.”