भारतीय सिनेसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा ऑगस्ट महिन्यात करण्यात आली होती. या पुरस्कारांचे वितरण आज दिल्ली इथं होत आहे. बॉलिवूड कलाकारांसह, साऊथ तसंच मराठी इंडस्ट्रीतले विजेते कलाकारांनी आज पुरस्कार स्वीकारले आहेत. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. 'नाळ २' या मराठी चित्रपटाला ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'सर्वोत्कृष्ट बालचित्रपट' या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.
मराठी चित्रपट 'नाळ २' ने सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा बहुमान पटकावला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी चित्रपटाचे प्रतिनिधी उमेशकुमार बन्सल उपस्थित होते. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उमेशकुमार बन्सल यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला. या यशाने मराठी चित्रपटसृष्टीतील बालचित्रपटांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून 'नाळ २'मधील त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोळके, भार्गव जगताप यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
'नाळ २' चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी याक्कनबी यांनी केले आहे. मुलांच्या भावविश्वावर आधारित या चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दल सुधाकर रेड्डी यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती 'आटपाट प्रोडक्शन' आणि 'झी स्टुडिओज' यांनी केली आहे.
'नाळ २' हा चित्रपट १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. जितेंद्र जोशी, श्रीनिवास पोकळे दीप्ती देवी आणि नागराज मंजुळे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 'नाळ' (Naal) हा चित्रपट १०८ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर त्याचा दुसरा भाग 'नाळ २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.