Manache Shok Teaser: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) लिखित आणि दिग्दर्शित 'मना'चे श्लोक या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. मन फकिरा या सिनेमानंतर मृण्मयीने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा दुसरा सिनेमा आहे. त्यामुळे मृण्मयीचे चाहते या सिनेमासाठी उत्सुक आहेत. सिनेमाची पहिली झलक आता आली आहे. यामध्ये मृण्मयीने पहिल्याच फ्रेमपासून लक्ष वेधून घेतलं आहे. नक्की कसा आहे टीझर?
'मनवा' आणि श्लोक' अशा दोघांची ही कहाणी दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीलाच मनवा येते आणि 'श्लोक'ला आवाज देते. श्लोक तिला काहीतरी बोलणार असतो पण तेवढ्यात मनवाची गाडी सुसाट धावते. मनवा एकामागोमाग एक वाक्य बोलायला सुरुवात करते. तिच्यामध्ये श्लोकला एकही शब्द बोलता येत नाही. शेवटी मनवा श्लोकला 'मी काय म्हणतेय ते कळलं का? असं विचारते. श्लोक शेवटी 'हो' एवढंच बोलतो. मनवा बाय म्हणून निघून जाते. मनवाचं बोलणं लग्न, कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, श्लोकसोबत तिची केमिस्ट्री या काही गोष्टी टीझरमधूनच स्पष्ट होतात. आता या दोघांची कहाणी नक्की काय आहे हे बघण्यासाठी ट्रेलरची वाट बघावी लागणार आहे.
टीझरमध्ये आजच्या तरुण पिढीची नाती, त्यांचे विचार दाखवले आहेत. मनवा आणि श्लोक ही दोन वेगवेगळी पात्रं विशेष आकर्षण ठरत आहेत. मनवा ही धाडसी आणि बिनधास्त मुलगी आहे, तर श्लोक हा शांत आणि समंजस मुलगा आहे. त्यांच्यातील संवाद चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहेत. हे दोन भिन्न स्वभावाचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या प्रेमकथेत काय घडतं, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणते, “हा माझ्यासाठी खास चित्रपट आहे. माझ्या मनाजवळचाच हा चित्रपट आहे, असं म्हटलं तरी चालेल. मनवा आणि श्लोकचा हा प्रवास प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच आवडेल.”
प्रस्तुतकर्ते नितीन वैद्य म्हणतात, “हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल. मुळात हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने यातील व्यक्तिरेखा आपल्याच घरातील वाटतील.’’
निर्माते संजय दावरा म्हणाले, “या चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनच करेल, कथा, कलाकार, दिग्दर्शन अशा सगळ्याच गोष्टी खूप छान जुळून आल्या आहेत.’’
चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत. ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.