अभिनेता सुबोध भावेचा (Subodh Bhave) आगामी बहुप्रतिक्षित सिनेमा 'संगीत मानापमान' (Sangeet Manapmaan) चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. शौर्य, धैर्या, प्रेम, मान, अपमानाची कथा सिनेमा बघायला मिळणार आहे. तसंच कलाकारांची मोठी फौज दिसत आहे. सोबतच रसिकांना सांगितीक मेजवानीही मिळणार आहे. पुढील महिन्यात सिनेमा रिलीज होत असून २ मिनिटे ४६ सेकंदाचा ट्रेलर खिळवून ठेवणारा आहे. सिनेमातील काही गाणीही आधीच प्रदर्शित झाली असून रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत.
'कट्यार काळजात घुसली' या सांगितीक सिनेमानंतर आता सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत 'संगीत मानापमान' सिनेमा येत आहे. पावणे तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये प्रेम, शौर्य, धैर्य, मान, अपमान अशी प्रत्येक बाजू मांडण्यात आली आहे. वैदेही परशुरामी भामिनी या राजकुमारीच्या भूमिकेत आहे. तर सुमीत राघवन उपसेनापती चंद्रविलाससोबत तिची प्रेमकथा सुरुवातीला दिसते. नंतर सुबोध भावे धैर्यधर या भूमिकेत येतो. भामिनीचे वडील तिच्यासाठी धैर्यधरची निवड करतात. भामिनी, धैर्यधर आणि चंद्रविलास यांच्यातील प्रेम, इर्ष्या, मान, आणि अपमानाची ही सांगितिक कथा खिळवून ठेवणारी आहे. यामध्ये अणृता खानविलकरचीही झलक दिसते. तर उपेंद्र लिमयेचीही विशेष भूमिका पाहायला मिळत आहे.
११४ वर्षांपूर्वी 'संगीत मानपमान' ह्या शब्दांनी अनुभवलेला मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ, त्या रंगभूमीला मराठी सिनेसृष्टीकडून दिलेली मानवंदना म्हणजे सुबोध भावे दिग्दर्शित हा सिनेमा. शंकर एहसान लॉय यांनीच संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक गायक-गायिकांनी यातील गाणी गायली आहेत. तर सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सुमीत राघवन, निवेदिता सराफ, नीना कुलकर्णी, उपेंद्र लिमये, शैलेश दातार आणि अर्चना निपाणकर यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. ज्योती देशपांडे आणि सुनील फडतरे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. १० जानेवारी रोजी सिनेमा रिलीज होत आहे.