Join us
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना का छळतेय?; अमृता फडणवीसांवर महेश टिळेकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 13:07 IST

 ‘म्हशीच्या हंबरडण्याचा आवज एकवेळ सहन करतील, पण...’

ठळक मुद्दे अमृतांनी हे गाणे नारी शक्तीला समर्पित केले आहे. हे गाणे शेअर करताना त्यांनी स्वत:चा आणि मुलीचा फोटो वापरला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक नवे गाणे भाऊबीजेच्या मुहूर्ताला रिलीज झाले आणि  ताबडतोब व्हायरल झाले.  अमृतांनी हे गाणे नारी शक्तीला समर्पित केले आहे. हे गाणे शेअर करताना त्यांनी स्वत:चा आणि मुलीचा फोटो वापरला आहे. अमृतांच्या चाहत्यांना हे गाणे आवडले असेलही पण मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता महेश टिळेकर यांनी मात्र अमृतांच्या या गाण्यावर सडकून टीका केली आहे. ‘हिला नको गाऊ द्या,’ असे लिहित त्यांनी अमृतांच्या या गाण्यावर भलीमोठी पोस्ट शेअर केली. 

महेश टिळेकरांची पोस्ट, त्यांच्याच शब्दांत...

हिला नको गाऊ द्या...

चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर  पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही.  सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुस-याला आनंद देण्याऐवजी दु:ख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे?

गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा  व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे ‘आडात नसेल तर पोहºयात येणार कुठून?’ केवळ ह्या अश्या गायिकेला  प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी ,नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी  कंपनी का  पैसा खर्च करत आहे, त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक  न सुटणारे कोडे??आणि जर ह्या गायिके कडे स्वत:चा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वत: न गाता फक्त संगीत सेवा करावी. 

पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘आज अमृताचा घनु..’ या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो. इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा??- महेश टिळेकर     

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीस