Alka Kubal: आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (Alka Kubal). मराठी सिनेसृष्टीचा एक काळ त्यांनी गाजवला. 'माहेरची साडी', 'बाळाचे बाप ब्रम्हचारी', 'आई तुझा आशीर्वाद' आणि 'सुहासिनीची ही सत्वपरीक्षा' असे सुपरहिट सिनेमे त्यांनी इंडस्ट्रीला दिले आहे. परंतु 'माहेरीची साडी' मधील लक्ष्मी आजही लोकांच्या स्मरणात आहे. पण, मराठी सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर अलका कुबल यांनी हिंदी सिनेमे का केले नाहीत? याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे.
अभिनेत्री अलका कुबल यांनी अलिकडेच 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींबद्दल खुलासे केले. त्यावेळी अलका कुबल यांना एक प्रश्न विचारण्यात आला की, हिंदी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना सहकलाकारांच्या भूमिका दिल्या जातात, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता. त्यावर उत्तर देताना अलका कुबल म्हणाल्या, "मी असं म्हणणार नाही पण, आपल्याही मराठी अभिनेत्रींनी बॉलिवूड गाजवलं आहे. अगदी आपल्यासारख्या मराठी इंडस्ट्रीतून त्या आल्या नाही पण, माधुरी दीक्षित सोनाली बेद्रें या अभिनेत्रींनी हिंदी सिनेसृष्टीत स्वत: चं साम्राज्य निर्माण केलं. मुळात त्यांनी सुरुवातच हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून केली. "
पुढे अलका कुबल यांनी सांगितलं, "पण, मला ज्या हिंदी चित्रपटांसाठी ऑफर्स आल्या त्या फार काही मोठ्या नव्हत्या. कधी वहिनीचा रोल तर मग तिथे चार सीन, दोन सीन असायचे, अशा ऑफर्स यायच्या. मग मला असं वाटलं असं जाऊन काम करण्यापेक्षा हिंदीत काम करायचं नाही. हिंदी चित्रपट म्हणजे येवढं काय आहे? मी हिंदी चित्रपट का करावेत? मग जर मी हिंदी सिनेमे केले तर निदान योग्य भूमिका तरी मिळाली पाहिजे. तसं बॅनर तरी पाहिजे ज्याने माझं करिअर बनेल."
म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं नाही
"मग मी इथे मराठी सिनेसृष्टीत सम्राज्ञी सारखी होते. ते सोडून नको ते करायला मी जायचं आणि माझ्या मराठी ऑडियन्सच्या मनातून निघून जायचं. त्यामुळे मी हिंदी चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. नुसतं पैश्यांसाठी आणि पर-डे चांगला मिळतोय म्हणून मी काम करायचं त्यापेक्षा मी मराठीत खूश आहे. त्यामुळे मला त्याची कधी खंत वाटली नाही." असा खुलासा त्यांनी केला.