Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिया बापटची बॉलिवूड चित्रपटात वर्णी! नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर करणार स्क्रीन शेअर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 16:21 IST

प्रिया बॉलिवूड सिनेमांत झळकणार आहे. तिला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे.

प्रिया बापट ही मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सर्वच माध्यमांमध्ये प्रियाने काम केलं आहे. तिची सिटी ऑफ ड्रीम ही सीरिज प्रचंड गाजली.विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं प्रेम मिळवणाऱ्या प्रियाला आता लॉटरी लागली आहे. प्रिया बॉलिवूड सिनेमांत झळकणार आहे. तिला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

प्रिया लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'प्रोडक्शन नंबर ८' या बॉलिवूड सिनेमात प्रियाची वर्णी लागली आहे. सेजल सेठ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून यामध्ये प्रिया नवाजु्द्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. बीएसएल फिल्म्स या निर्मिती कंपनीकडून नव्या प्रोजेक्टची घोषणा करत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर प्रिया बापटही दिसणार आहे. ९०च्या काळातील गोष्ट या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकीने पोस्ट शेअर करत प्रियाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत नव्या प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना दिली आहे. या नव्या प्रवासासाठी उत्सुक असल्याचं प्रियाने म्हटलं आहे. प्रियाच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर अभिनेत्रीला पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. 

सध्या प्रिया तिच्या 'जर तर'ची गोष्ट या नाटकामुळे चर्चेत आहे. यामध्ये प्रियाबरोबर उमेश कामतही मुख्य भूमिकेत आहे. प्रियाने 'काकस्पर्श', 'वजनदार', 'टाइम प्लीज', 'हॅपी जर्नी' अशा अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ती संजय दत्तच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमातही झळकली होती. 

टॅग्स :प्रिया बापटनवाझुद्दीन सिद्दीकीसेलिब्रिटीसिनेमा