Join us
Daily Top 2Weekly Top 5

“आपला वाटणारा चेहरा हरपला”, सीमा देव यांच्या निधनानंतर महेश कोठारे भावुक, म्हणाले, “चिमणी पाखरं चित्रपटावेळी...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 12:54 IST

Seema Deo Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर दिग्दर्शक महेश कोठारेंनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना अल्झायमरने ग्रासलं होतं. मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे भावुक झाले आहेत.

सीमा देव यांच्या निधनानंतर महेश कोठारेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. “त्या खूप काळापासून आजारी होत्या. पण, एक उत्कृष्ट कलावंत आपल्यातून गेल्या याचं खूप वाईट वाटलं. माझ्या लहानपणापासून मी त्यांना ओळखतो. माझी आई सरोज कोठारे हिनेदेखील त्यांच्याबरोबर काम केलं होतं. शोधा म्हणजे सापडेल या चित्रपटात त्या दोघी मुख्य भूमिकेत होत्या. त्या चित्रपटात रमेश देवही होते. माझ्या चिमणी पाखरं चित्रपटात मला रमेशजी आणि सीमा देव दोघेही पाहुणे कलाकार म्हणून हवे होते. तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो. पण, तेव्हा त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली होती. मग त्या चित्रपटात रमेश देव आणि जयश्री गडकर होत्या. त्यांचा चेहरा आपलासा वाटायचा. कुठल्याही भूमिकेत त्या चोख बसायच्या. त्यांनी केवळ मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं. आनंद चित्रपटात रमेश देव आणि सीमा देव यांनी खूप छान काम केलं होतं. आमच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट होती. देव परिवाराच्या दु:खात सहभागी आहे,” असं म्हणत महेश कोठारेंनी सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली.

"तुझ्या मांडीवर शेवटचा श्वास सोडावा", रमेश देव असं म्हणताच सीमा देव झालेल्या भावुक

सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. १९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटादतून त्यांनी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांचे ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. 'आनंद' या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते. सीमा देव यांनी दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. २०१३ साली त्यांनी मोठ्या उत्साहात लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांचं फेब्रुवारी २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अजिंक्य देव आणि अभिनय देव ही त्यांची मुलेही मनोरंजनविश्वात कार्यरत आहेत.

टॅग्स :अजिंक्य देवमराठी अभिनेतारमेश देवमराठी चित्रपट