Join us

'गाढवाचं लग्न' चित्रपटाचा दुसरा भाग येणार; सावळ्या कुंभाराच्या 'गंगी'नं दिली हिंट! अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:20 IST

'गाढवाचं लग्न' सिनेमाचा दुसरा भाग येणार; मुख्य अभिनेत्रीने दिली हिंट

Gadhavacha Lagna Movie: काही चित्रपट अनेक वर्षांनंतरही प्रेक्षक म्हणून आपल्या मनात कायम घर करुन राहतात. यातील कलाकार, संवाद, गाणी यांची वर्षानुवर्षे चर्चा होत असते. असाच एक मराठी चित्रपट म्हणजे 'गाढवाचं लग्न'. २००७ साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आजही हा चित्रपट पाहिला तरी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आणि त्या भूमिका अजरामर केल्या. या सिनेमात मकरंद अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारली होती. तर राजश्री लांडगे हिने त्यांच्या पत्नीची म्हणजे गंगेची भूमिका साकारली होती. दरम्यान, आता जवळपास १८ वर्षानंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची हिंट खुद्द अभिनेत्री राजश्री लांडगेने दिली आहे. 

'गाढवाचं लग्न' चित्रपटात सावळ्या कुंभाराची पत्नी म्हणजेच गंगीची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजश्री लांडगेने एका मुलाखतीत 'गाढवाचं लग्न' पार्ट-२ वर काम सुरु असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं आहे.  नुकतीच राजश्री लांडगेने 'Filmy Marathi KMW' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यादरम्यान, अभिनेत्री म्हणाली, "सध्या गाढवाचं लग्न चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर आम्ही काम करतोय. हा चित्रपट कधी येईल? याबद्दल काही स्पष्ट सांगता येणार नाही आहे. परंतु आम्ही त्या प्रोजेक्टवर काम करण्याच्या प्रयत्नात आहोत. तो प्रोजेक्ट करेपर्यंत मी माझी गावाकडील सगळी जी काही सामाजिक कामं आहेत, आदिवासी भागातील शाळेच्या संबंधित कामे असतील ती पूर्ण करुन मग या चित्रपटाकडे माझा पूर्ण फोकस असेल."

त्यानंतर मग अभिनेत्री म्हणाली, "माझे वडील ही सगळी कामे बघत होते. पण, कालांतराने त्यांच्या वयोमानामुळे ही काम माझ्याकडे आली आणि त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त वेळ मी गावाकडे असते. मुंबईत फार कमी असते. ही कामे झाल्यानंतर मी चित्रपटासंबधित कामाकडे वळणार आहे." असा खुलासा करत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने आपण आजही कलाक्षेत्रात सक्रिय आहोत, असं देखील सांगितलं आहे. 

दरम्यान, राजश्रीचा राजकीय क्षेत्राशी देखील जवळचा संबंध आहे. तिचे आजोबा कर्मवीर मारुतीराव लांडगे पाटील हे राजकारणातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जातात. तर तिचे वडीलही पाटबंधारे खात्यात सचिव म्हणून कार्यरत होते. 'गाढवाचं लग्न' चित्रपटानंतर राजश्री लांडगे निर्मिती क्षेत्रात सक्रिय आहे. 'सिटीझन' या चित्रपटाची निर्मिती तिने केली आहे. 

टॅग्स :मराठी चित्रपटमकरंद अनासपुरेसेलिब्रिटी