महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर नामांकित राज कपूर कपूर, व्ही शांताराम, जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री मुक्ता बर्वेला (Mukta Barve) व्ही शांताराम विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभिनेत्री मुक्ता बर्वेला मराठी सिनेसृष्टीत २६ वर्ष झाली आहेत. मराठी मनोरंजनविश्वातील तिच्या योगदानासाठी मुक्ता बर्वेला व्ही शांताराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार मिळाला. तसंच सन्मानचिन्ह आणि सहा लाख रुपये रोख बक्षीस देऊन मुक्ताला सन्मानित करण्यात आले. यावेळी मुक्ता बर्वेची आईही उपस्थित होती. लेकीला एवढा प्रतिष्ठित पुरस्कार मिळताना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना मुक्ता म्हणाली, "आज मला कृतज्ञता व्यक्त करावी वाटतीये. शासनाने कायमच माझं मनापासून कौतुक केलं आहे. आज विशेष योगदानासाठी मला पुरस्कार मिळाला याचा आनंद वाटतोय. तुमच्या माझ्याकडून आणखी ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन."
मुक्ता बर्वेने १९९९ साली 'घडलंय बिघडलंय' नाटकातून मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. मराठी मालिका, नाटक आणि सिनेमांमधून तिने अभिनयाची छाप पाडली. २००४ साली तिने 'चकवा' हा सिनेमा केला होता. पदार्पणासाठी मुक्ताला शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तर आज विशेष योगदान पुरस्कार मिळाल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे.