अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. कार्यक्रमात सेलिब्रिटी त्यांच्या नृत्याविष्काराने चाहत्यांचं मनोरंजन करतात. अशाच एका दहीहंडीच्या कार्यक्रमाला अभिनेत्री डान्स करताना स्टेजवरुन पडता पडता वाचली. याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री डोक्यावर पदर घेऊन डान्स करताना दिसत आहे. चाहत्यांकडे पाठ करून ती पाठीमागे जात होती. मात्र तेवढ्यातच स्टेजचा अंदाज न आल्याने एका कोपऱ्यावरुन तिचा पाय घसरला पण ती पडता पडता वाचली.
व्हिडीओत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे मेघा घाडगे. एका दहीहंडीच्या कार्यक्रमाला तिने हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील व्हिडीओ मेघाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणते, "चंद्रा... जरासा पाय अजून मागे पडला असता तर मला कितीला पडली असती दहीहंडी... थोडक्यात वाचले...नाचताना पदर घेण्याआधी स्टेजचा अंदाज घेणं महत्वाचं असतं हे त्या दिवशी विसरले". या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी तिला काळजी घेण्यास सांगितलं आहे.
मेघा घाडगे ही केवळ एक अभिनेत्री नसून उत्तम लावणीसम्राज्ञी आहे. मेघाच्या अदा आणि ठसकेबाज लावणीने चाहते फिदा होतात. अनेक लावणी गाण्यांवर तिने तिची नृत्यकला दाखवली आहे. 'पछाडलेला' सिनेमातील तिचं 'मला भुतानं पछाडलं' हे लावणी साँग खूपच लोकप्रिय ठरलं होतं.