Bhakti Barve: आपल्या तडफदार अभिनयाने लक्षवेधी भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या बऱ्याच अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीला मिळाल्या. पण यातील फुलराणी मात्र एकच होती. मराठीतली सुपरस्टार 'फुलराणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलासंपन्न असणारी अभिनेत्री म्हणजे भक्ती बर्वे. आपल्या नजरेनंच या अभिनेत्रीने रसिकांना घायाळ केलं होतं. 'ती फुलराणी' म्हटलं की आजही प्रेक्षकांना या अभिनेत्रीचा चेहरा आठवतो. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील त्या एकमेव स्त्रीस्टार!भक्ती यांच्या अभिनयला तोड नव्हती. बालरंगभूमीपासून सुरु झालेला प्रवास लक्षवेधी होता. दरम्यान,सगळं काही सुरळीत असताना एका अपघातात या अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज या अभिनेत्रीचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल जाणून घेऊया...
बालकलाकार ते मराठी सिनेसृष्टी असा प्रवास करणाऱ्या भक्ती बर्वे यांचा जन्म १० सप्टेंबर १९४८ मध्ये सांगली येथे झाला.शाळेत असतानाच सुधा करमरकर यांच्या प्रोडक्शन हाऊससोबत त्या बालनाटकांमध्ये काम करू लागल्या. त्यांनी निवेदिका म्हणून ऑल इंडिया रेडिओवर देखील काम केले. त्यानंतर त्या मुंबई दूरदर्शनला बातम्या देत असत. आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.अजब न्याय वर्तुळाचा या नाटकामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. या लेडी सुपरस्टार अभिनेत्रीचा अंत डोळ्यात पाणी आणणारा आहे.
पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे.फुलराणी आणि भक्ती बर्वे हे एक समीकरणच झाले होते. त्यांनी 'ती फुलराणी' या नाटकात साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती.'फुलराणी'चे ११११ हून अधिक प्रयोग झाले. त्यांनी केवळ मराठी मध्येच नव्हे तर हिंदी आणि गुजराती चित्रपटसृष्टीत देखील काम केलं.
भक्ती बर्वे यांच्या भूमिका असलेली नाटके - अखेरचा सवाल, अल्लाउद्दीन व जादूचा दिवा (बालनाट्य), अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होतेय (मराठी आणि गुजरातीत-बा रिटायर थाय छे), आधे अधुरे(हिंदी आणि मराठी), आले देवाजीच्या मना, कळलाव्या कांद्याची कहाणी (बालनाट्य), गांधी आणि आंबेडकर, घरकुल, चिनी बदाम (बालनाट्य), जादूची वेल (बालनाट्य), टिळक आणि आगरकर, ती फुलराणी ही त्यांची नाटके विशेष गाजली. 'आई रिटायर होत आहे', हे त्यांचं नाटकंही चांगलं गाजलं. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
भक्ती बर्वे यांनी हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते शफी इनामदार यांच्यासोबत लग्न झालं होतं. दरम्यान, १३ मार्च १९९६ मध्ये शफी याचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. शफी यांच्या निधनानंतर पाच वर्षानंतर १२ फेब्रुवारी २००१ रोजी वाई येथून मुंबईला परतताना भक्ती बर्वे यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचं दुर्दैवी निधन झालं.