रमेश भाटकर हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. रमेश यांना आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. काही वर्षांपूर्वी रमेश यांचं कॅन्सरने निधन झालं. त्यामुळे रमेश यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. रमेश भाटकर यांच्यावर काही वर्षांपूर्वी गंभीर आरोप लागले. त्यामुळेच त्यांच्या मुलाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा लेकाच्या लग्नपत्रिकेवर रमेश यांचं नाव छापलं गेलं नव्हतं. काय घडलं होतं नेमकं? जाणून घ्या.
लेकाच्या पत्रिकेत रमेश भाटकर यांचं नाव का नव्हतं?
१७ वर्षांच्या एका अभिनेत्रीने रमेश भाटकर यांच्यावर बलात्काराचे आरोप लावले. त्यामुळे रमेश भाटकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला. रमेश यांच्या पत्नी मृदुला या हायकोर्टाच्या न्यायाधीश आहेत. पतीवर असा आरोप झाल्यावर मृदुला यांना साहजिक धक्का बसला. त्याचवेळी रमेश यांचा एकुलता एक मुलगा हर्षवर्धनचं लग्न होतं. पण भाटकर कुटुंबाने हे प्रकरण शांतपणे हाताळण्याचा निर्णय घेतला. आरपारला दिलेल्या मुलाखतीत मृदुला यांनी हा किस्सा सांगितला होता.
मृदुला म्हणाल्या- "तेव्हा रमेशचं रिव्हिजन होतं. जिल्हा न्यायालयाने रमेशला निर्दोष सोडलं होतं. पण रमेशचं रिव्हिजनच सरकारने टाकलं. मला ते कळलंच नव्हतं की. सरकारने असं काय टाकलं? आता सरकारने रिव्हिजन टाकल्यावर कायदेशीररित्या आम्हाला लढणं भाग होतं. रमेश त्यावेळेस आरोपी नव्हता पण तो पार्टी होता. म्हणजे त्याचं मॅटर होतं. सरकारविरुद्ध रमेश भाटकर अशी ती केस होती. म्हणजे तेव्हा रमेश आरोपी नव्हता तेव्हा तो सुटला होता."
"जेव्हा उच्च न्यायालयाच्या समोर ती जर केस असेल तर मला प्रश्न पडला की, हर्षवर्धनचं आणि सुप्रियाचं लग्न आहे. तर मला प्रश्न पडला की, आपण यांना आमंत्रण देतोय म्हणजे रमेश आणि मृदुला पत्रिकेवरती कसं लिहिणार? कारण ते शेवटी पार्टीकडून आमंत्रण दिलं गेलं, असं असेल. मग या गोष्टीवरती हर्ष आणि सुप्रियानेच तोडगा काढला. आम्ही असं ठरवलं की, त्या दोघांच्या वतीनेच आमंत्रण द्यायचं. त्यानंतर एका साध्या कागदावरती आम्ही 'प्लीज कम फॉर अवर वेडिंग' असं लिहिलं, आणि त्या दोघांनीच त्यांच्या लग्नाची पत्रिका त्यांच्याच नावाने छापली."
मृदुला शेवटी सांगतात की, "म्हणजे लग्नात इतकी पथ्य पाळली की, रमेशबरोबर कोणत्याही न्यायमूर्तींचा फोटोपण नाही. एका बाजूला सगळे कलाकार मंडळी आणि रमेश आणि दुसऱ्या बाजूला सर्व जजेस असं ते केलं होतं." अशाप्रकारे रमेश यांच्या पत्नी मृदुला यांनी हा कठीण काळ उलगडला. २०१९ रोजी रमेश भाटकर यांचं निधन झालं.