Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाबा... तू कधी घेणार रेंज रोव्हर?' लेकीच्या प्रश्नानंतर मराठमोळ्या अभिनेत्याने घेतली महागडी कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:56 IST

अभिनेत्याच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

मराठी कलाकारांनी महागड्या  कार घेणं काही नवीन नाही. पण लेकीचा एक प्रश्न आणि मराठमोळ्या अभिनेत्याने थेट रेंज रोव्हर कारच घेतली. तसंच याचा व्हिडिओ शेअर करत त्याने 'हो मराठी कलाकारही रेंज रोव्हर घेऊ शकतात' असं कॅप्शन लिहिलं. अनेक मराठी कलाकारांनी त्याचं अभिनंदनही केलं. कोण आहे हा अभिनेता?

तर हा आहे पुष्कर जोग (Pushkar Jog). अभिनेता आणि निर्माता अशा दोन्ही भूमिका पार पाडणारा पुष्कर सध्या वेगवेगळ्या सिनेमांमधून समोर येत आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही माध्यमात तो काम करतोय. शिवाय परदेशातही शूट करतोय. पुष्करने नुकतीच रेंज रोव्हर कार घेतली. लेकीसोबत कारची झलक दाखवतानाचा व्हिडिओ त्याने शेअर केला. यासोबत त्याने लिहिले, "आई आणि बाबांचा आशीर्वाद...फेलिशाने मला दुबईत असताना प्रश्न विचारला की डॅडा, तू रेंज रोव्हर कधी घेणार? ही कार तुझ्यासाठी माझी एंजल... ps: हो मराठी कलाकारही रेंज रोव्हर घेऊ शकतात"

रेंज रोव्हर ही सर्वात महागड्या लक्झरी कारपैकी एक आहे. अनेक बॉलिवूड कलाकार, नेते मंडळी, श्रीमंतांकडे ही कार असते. म्हणूनच पुष्करने असं कॅप्शन लिहित आपणही रेंज रोव्हर घेतल्याची बातमी चाहत्यांना दिली.

पुष्कर जोग बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचला. त्याची सई आणि मेघा धाडेसोबत चांगली मैत्री होती. तसंच घरात असताना पुष्करचं लेक फेलिशावर किती प्रेम आहे हे सर्वांनाच दिसलं होतं. आपल्या लाडक्या लेकीसाठीच त्याने ही महागडी कार खरेदी केली आहे.

टॅग्स :पुष्कर जोगमराठी अभिनेतालँड रोव्हरकारसोशल मीडिया