Gargi Phule: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे निळू फुले. अनेक सिनेमांत खलनायकाची तगडी भूमिका साकारुनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. 'सिंहासन', 'पिंजरा', 'गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं', 'सामना', 'फटाकडी', 'प्रतिकार' अशा अनेक सिनेमांमध्ये काम करून त्यांनी वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत निळू फुलेंची मुलगी गार्गी फुले (Gargi Phule) यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करुन त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. सध्या गार्गी फुले एका कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. दिवंगत अभिनेते निळू फुले यांचे अनेक डायलॉग फेमस आहेत. पण,नुकत्या 'बाई वाड्यावर या' असा डायलॉग त्यांनी कधीच कुठल्या चित्रपटात म्हटला नाही, असं मत त्यांची लेक गार्गी फुले यांनी मांडलं आहे.
नुकतीच गार्गी फुले या 'वास्तव कट्टा' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, गार्गी फुले म्हणाल्या, "बाबाच्या एकाही चित्रपटात त्यांनी हे म्हटलेलं नाही की, बाई वाड्यावर या! तुम्ही शोधून दाखवा. मी अनेकांना सांगते की प्लिज शोधून दाखवा मला. मीही शोधते. मी अनेक चित्रपट बघितले पण 'बाई बाड्यावर या' असं बाबा कुठेही म्हटलेला नाही. मला बाबाची ती इमेज मोडायची आहे."
पुढे त्यांनी म्हटलं,"आता नवीन पिढीला जर निळू फुले कळावे असं वाटत असेल तर 'बाई वाड्यावर या' हीच इमेज त्याची नाही आहे. म्हणजे त्यांनी समाजकारण केलं आहे. समाजकार्य केलंय, यासाठी ते अनेक वर्ष लढले आहेत. चित्रपट सृष्टीमध्ये कामगारांसाठी जो लढा उभा राहिला तो मिथुन चक्रवर्ती आणि अशा काही लोकांनी केला आहे. या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही. माझं असं म्हणणं आहे की, त्यांचं सामाजिक कार्य किती मोठं होतं हेही लोकांना माहिती असायला हवं." असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, गार्गी फुले थत्ते यांनी देखील वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवला. घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या गार्गी या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी 'तुला पाहते रे', 'राजा राणीची गं जोडी', 'शुभविवाह', 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत झळकल्या.