Milind Shinde: शिक्षण ही अशी संपत्ती आहे, जी आपल्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकतं नाही असं म्हटलं जातं. शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर कोणतीच गोष्ट त्यामध्ये अडथळा ठरु शकत नाही. त्यासाठी फक्त जिद्द आणि इच्छाशक्तीची गरज असते. अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा काही अडचणींमुळे अनेकजण अगदी वयाच्या पन्नाशीतही शिक्षण घेतात. अशाच प्रकारे प्रसिद्ध मराठमोळे अभिनेते मिलिंद शिंदे यांनी त्याचं शिक्षणाचं स्वप्न पू्र्ण केलं आहे. वयाच्या पन्नाशीत या अभिनेत्याने डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करुन त्यांनी चाहत्यांना माहिती दिली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मिलिंद शिंदे यांनी आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली. नुकतीच त्यांना पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर पोस्ट शेअर करत मिलिंद शिंदेंनी चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. दरम्यान, मिलिंद शिंदे यांनी परफॉर्मिंग आर्टस् मध्ये 'विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील स्त्री भूमिका' या विषयावर त्यांनी पीएचडी केली आहे.'आता मला तुम्ही डॉ मिलिंद शिंदे'म्हणू शकता'....", असं म्हणत त्यांनी आनंद भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या जीवनातील एक अभिमानाचा क्षण आहे, असं म्हटंल तर वावगं ठरणार नाही.
मिलिंद शिंदे यांनी आजवर अनेक भूमिका गाजवल्या आहेत.चित्रपट असो किंवा मालिका त्यांमधील भूमिकांमध्ये त्यांनी केवळ शारीरिक हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर त्यांनी अभिनयाचे रंग भरले आहेत. छोट्या पडद्यावरील 'तू तिथे मी', 'देवमाणूस' यांसारख्या मालिकांमधील त्यांनी केलेल्या कामाचं आजही कौतुक होतं. तसंच'झुलवा', 'ती फुलराणी', 'कथा अरुणाची' यांसारखी लक्षवेधी नाटके आणि 'नॉट ओन्ली मिसेस राऊत', 'नटरंग', 'पारध' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका वठवल्या.