इलॉन मस्क यांच्या मालकीची असलेली टेस्ला कंपनीची कार चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये टेस्लाचं पहिलं शोरुम काही दिवसांपूर्वीच सुरू झालं. त्यानंतर देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिळवला आहे. प्रताप सरनाईकांनी आपल्या नातवासाठी ही टेस्ला कार खरेदी केल्याचं म्हटलं आहे. सरनाईकांनी टेस्ला कार खरेदी केल्यानंतर मराठी अभिनेत्याने त्यांना टोला लगावत एक पोस्ट शेअर केली आहे.
मराठी अभिनेता आस्ताद काळेने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो, "त्या नातवासाठी घेतलेल्या नवीन टेस्ला रुपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका?? आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, कर भरणाऱ्या तरीही खड्ड्यांमधून आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली वाहने चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे हो काका? ता.क :- एवढा पैसा आला कुठून? आणि तुमच्या नातवाला ते खेळणं घोडबंदर रस्त्यावरुन न्यायला सांगा ना बाकी लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता...".
प्रताप सरनाईक यांनी टेस्ला कारचं Model Y हे व्हर्जन खरेदी केलं आहे. याच्या RWD व्हर्जनची किंमत ₹६१.०७ लाख असून, LR RWD व्हर्जनसाठी ही किंमत ₹६९.१५ लाख इतकी आहे. आस्तादच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून त्याची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. आस्तादच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, आस्ताद कायमच सोशल मीडियावरुन आजूबाजूच्या घटनांवर व्यक्त होत असतो. अनेकदा त्याचं मत तो अगदी परखडपणे मांडताना दिसतो.