'महाराष्ट्र भूषण' आणि 'पद्मश्री' पुरस्कार विजेते अशोक सराफ (Ashok Saraf) सर्वांचे लाडके अभिनेते आहेत. ८०-९० च्या दशकातील त्यांचे प्रत्येक चित्रपट आजही सर्वांच्या लक्षात आहेत. त्यांचे कॉमेडी सीन्स आजही ताजे वाटतात. त्याच्यावर मीम्सही बनतात. त्यांची शब्दफेक, हावभाव आणि विसंगतीतून अगदी सहज होणारी कॉमेडी प्रेक्षकांना भावते. नुकतंच अशोक सराफ यांनी कॉमेडी या अभिनयाच्या जॉनरवर भाष्य केलं आहे.
अशोक सराफ यांनी विविधांगी अभिनय केला. कॉमेडी, गंभीर, खलनायक असे कॅरेक्टर केले. पण त्यांची कॉमेडीच सर्वांच्या जास्त लक्षात राहिली. विनोद म्हणजे काय? आणि त्यांना काय करायला मजा येते असं विचारल्यावर 'अमुक तमुक'ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले, "दुसऱ्याच्या दु:खावर बोट ठेवून केलेला विनोद मी मानत नाही. दुसऱ्याच्या विचित्र वागण्यावर केलेला सुद्धा मी मानत नाही. बोलता बोलता झालेला, शाब्दिक विनोदही मी मान्य करत नाही. बोलता बोलता निघालेल्या विसंगतीवर जो विनोद होतो तो खरा विनोद. ओढून ताणून न करता सहज निघाला तर तो जास्त भावतो. त्यापुढेही तुम्ही तो कसा सादर करता हेही महत्वाचं आहे. मुळात विनोद करणं खूप कठीण आहे. आजकाल ट ला फ करुनच विनोद लिहिणं सुरु आहे.
ते पुढे म्हणाले, "मी करिअरची सुरुवात कॉमेडीपासून केली. लोकांना माझं काम आवडलं. त्यामुळे लोकांना जे आवडलं तेच मला देणं भाग पडलं. म्हणून मी कॉमेडियन म्हणवतो पण मी मुळात कॉमेडियन नाहीए. मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. विनोद किंवा कॉमेडी ही मी करतो. तो एक अभिनयाचा भाग आहे म्हणून मी करतो. तो यशस्वी झाला ही गोष्ट वेगळी पण मी कॉमेडियन नाही. मला असा उभा केला तर मी कॉमेडी दिसणार नाही मी व्हिलन दिसेन. मला कॉमेडी करावी लागते. तर ते मला करायला आवडतं म्हणजे मला तेच करावं लागलं. कारण लोकांना तेच आवडलं."