अंकुश चौधरी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. परंतु, सध्या मात्र तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अंकुश चौधरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याला पोलिसांनी अटक केल्याचं दिसत आहे. पोलिसांच्या गाडीतून अंकुश चौधरी बाहेर पडत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. याशिवाय त्याच्या हातात बेड्याही दिसत आहेत. पोलिसांनी त्याला घेरल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर अंकुशला तुरुंगात टाकल्याचंही दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ पाहून खरं तर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण, अंकुशला खरोखर पोलिसांनी अटक केलेली नाही. तर त्याचा आगामी 'P.S.I.अर्जुन' या सिनेमातील एक लूक आहे. अंकुश चौधरी 'P.S.I.अर्जुन' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चचा सोहळा नुकताच पार पडला. या ट्रेलर लॉन्चला अंकुश चौधरीने अशी हटके एन्ट्री घेतली होती. 'P.S.I.अर्जुन' सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
'P.S.I.अर्जुन' सिनेमात अंकुश चौधरी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या ९ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अंकुश चौधरीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. भूषण पटेल यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून अंकुशसोबत सिनेमात अक्षया हिंदळकर, किशोर कदम, नंदू माधव, राजेंद्र शिसाटकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.