Join us
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला...", हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर अभिनय बेर्डेचं मत, चाहत्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:21 IST

हिंदी भाषा सक्तीची करावी का? अभिनय बेर्डे स्पष्टच म्हणाला- "त्याऐवजी मुलांना टेक्निकल विषय..." 

Abhinay Berde On Hindi Language Controversy: राज्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवावी लागेल, असा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा सर्व स्तरातून कडाडून विरोध करण्यात आला.  राज्य शालेय आराखड्याद्वारे तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा विषय अनिवार्य असेल, असे त्यात नमूद करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यभरातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळातून प्रचंड टीका झाली. यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असे स्पष्ट केलं होतं. याबाबत शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री उशिरा शुद्धीपत्रक काढले.  मात्र, विरोध झाल्याने सरकारने या निर्णयाला स्थगिती देत आणि आता सुधारित निर्णय जारी केला आहे. यावर लोकप्रिय मराठी अभिनेता अभिनय बेर्डे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

नुकताच अभिनय बेर्डेने 'महाराष्ट्र टाईम्स' सोबत संवाद साधला. हिंदी भाषा सक्तीची करावी का? याबद्दल तुला काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यादरम्यान, हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर आपलं मत मांडत अभिनेता म्हणाला, "मराठी भाषा ही गरजेची आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. हिंदी भाषा सक्तीची करून त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. कारण हिंदी भाषेचा प्रसार अगोदरच झालेला आहे. संसदेत हिंदी बोललं जातं, हिंदी चित्रपटही भरपूर निघतात त्यात आता तुम्ही त्याची सक्ती करताय, याची काहीच गरज नाहीए. त्याऐवजी मुलांना टेक्निकल विषय शिकवा किंवा परदेशी भाषा शिकवा तर ते कदाचित फायदेशीर ठरेल."

त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला, "फक्त शासकीय शाळेत मराठी न शिकवता सीबीएससी, आईसी जितक्या युनिव्हर्सिटी आहेत तिथे मराठीची सक्ती हवी. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी वाचता आणि बोलता आलीच पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं ही आपल्या भाषेसाठी आणि इकडे राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी गरजेचं आहे." असं म्हणत अभिनेता अभिनय बेर्डेने शाळेत हिंदी भाषा सक्तीवर हे परखड मत व्यक्त केलं आहे. 

सुधारित शासन निर्णयात काय म्हटलं...?

हिंदी ही 'अनिवार्य' ऐवजी 'सर्वसाधारणपणे' तिसरी भाषा असेल आणि शाळेतील प्रत्येक इयत्तेत २० विद्यार्थ्यांनी हिंदी व्यतिरिक्त इतर भारतीय भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना ती भाषा शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, ही संख्या कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांना ती भाषा ऑनलाइन शिकवली जाणार आहे.

टॅग्स :अभिनय बेर्डेमराठी अभिनेतामराठीहिंदीमहाराष्ट्र