भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर, पर्ण पेठे आणि आशुतोष गोवारीकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'आता थांबायचं नाय' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. उद्या अर्थात १ मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवराज वायचळने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'आता थांबायचं नाय' सिनेमाचा ग्रँड प्रिमिअर नुकताच पार पडला. या सोहळ्याला इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सिनेमा पाहायला उपस्थित होते. त्यानिमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळेने सिनेमा पाहून लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.
'आता थांबायचं नाय' पाहून शिवानी काय म्हणाली
'आता थांबायचं नाय' सिनेमाच्या कास्टसोबत शिवानीने फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करुन ती लिहिते की, "प्रायोगिक नाटकाची प्रॉपर्टी शोधत मार्केट मध्ये पुण्यात फिरण्याच्या काळापासून, प्रयोगानंतर ' जयश्री ' हॉटेल मध्ये रात्री १२ नंतर पावभाजी खात कट्टा टाकण्यापासून, मुंबईत गोरेगाव मध्ये अनेक वर्ष घरं बदलण्यापासून, अनेक किस्से बघुन, करून त्यावर गॉसिप करण्याच्या काळापासून, " झी ' ची फिल्म मिळाली पाहिजे यार" असं सतत एकमेकांना म्हणण्यापासून ते काल एका संवेदनशील, उत्तम कलाकृतीवर दिग्दर्शक आणि लेखक म्हणून जेव्हा शिवराज वायचळ आणि ओमकार गोखले तुमची नावं पाहिली. आपल्या theatron entertainment चं नाव पाहिलं, तेव्हा हा प्रवास बघून उर भरून आलं!!!
"Collective energy म्हणजे काय ह्याचा अनुभव आला! आणि जेव्हा माझ्या मालिकेत मित्रांच्या फिल्मचं प्रमोशन करायला खास बोलावलं तेव्हा तर इतका आनंद झाला! खूप अभिमान वाटला! चित्रपट म्हणून तो केवळ मित्रांचा आहे म्हणून प्रमोशन नाही करत आहे, पण खरंच एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरची ,चांगली बनवलेली फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी ह्या हेतूने लिहिते आहे! BMC कामगार आणि त्यांच्या असंख्य मूक वेदनांना आवाज फोडणारी ही फिल्म, सत्य घटनेवर आधारित आहे. ज्या माणसाला कष्टाची किंमत आहे, त्याला प्रत्येकाला ही नक्कीच खूप आवडेल! आणि कमाल , power packed performances तर आहेतच! सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, प्राजक्ता हनमघर खूप मज्जा आली! Bravo team!"