महेश मांजरेकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. तर आपल्या कलाकृतींनी त्यांनी बॉलिवूडही गाजवलं आहे. महेश मांजरेकराचा 'एक राधा एक मीरा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकरांनी मराठी सिनेमा, बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीवर भाष्य केलं.
"आपण एका अशा भाषेत सिनेमा करतोय, जी सध्या देशातील सगळ्यात दुर्लक्षित भाषा आहे. महाराष्ट्रात सिनेमा चालला आणि दुसरीकडे कुठेच चालला नाही, तरी सिनेमा जबरदस्त आहे असं इंडस्ट्रीमध्ये म्हटलं जातं. पण, महाराष्ट्रात मराठी सिनेमाला काहीच किंमत नाही. एखादा सिनेमा रखडला की तो रखडतोच. मराठी इंडस्ट्रीमध्ये सिनेमा कसा बनवायचा हे माहीत आहे, पण त्याचं पुढे काय करायचं हे कोणालाच माहीत नाही. एकतर मराठी सिनेमांना प्रेक्षक येत नाहीत. काहींना क्लासी सिनेमे आवडतात तर काहींना वेगळेच सिनेमे आवडतात. पण, असे सिनेमे केले तर मग ही मराठी संस्कृती नाही असं म्हटलं जातं. हिंदीसारखा सिनेमा काढल्यावर हिंदीसारखा का काढला? असा विचारलं जातं. पण, तुम्ही हिंदी सिनेमे बघायला जाता ना. मग मराठी सिनेमाला ग्लॅमर मिळालं तर काय प्रॉब्लेम आहे. मी ठरवलं आहे की १० कोटीचा सिनेमा असल्याशिवाय मी सिनेमा करणार नाही", असं ते 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
"कन्नड सिनेमाची परिस्थिती मराठीपेक्षाही वाईट होती. आता ते सिनेमेही चालायला लागलेत. तिकडे कोणाला तरी वाटलं की आपण सिनेमामध्ये खर्च करूया. जिकडे ४-५ कोटी खर्च व्हायचे तिथे केजीएफ सिनेमाला ४० कोटी लावले. आणि संपूर्ण इंडस्ट्री उठली. ज्या यशला कर्नाटक आणि बेळगावात कोणी बघत नव्हतं त्याला संपूर्ण इंडिया बघायला लागली. आपल्यात असं कोणीतरी करायला पाहिजे. आपल्याकडे विषय चांगले आहेत. पण, पैसे नाहीत", असंही त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, "हिंदी सिनेमाला लोक ५०० रुपयाचं तिकीट काढतात. मराठी नाटकांना लोक जातात. त्यामुळे काही कळत नाही. मराठी सिनेमाला ग्लॅमर आणि बिजनेस येणं खूप महत्त्वाचं आहे. मला असा एकही माणूस भेटला नाही. जो म्हणाला की पुष्पा २ सॉलिड सिनेमा आहे. तरीही तुडुंब थिएटर भरलेलं होतं. आपल्याकडे चांगले अभिनेते, कथा आहेत पण, फक्त पैसा नाही. साऊथवाल्यांनी येऊन जो धुमाकूळ घातलाय. हिंदीवाले सगळे घाबरून पळत आहेत. मुर्ख लोक आहेत".