मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे भाजपाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका कार्यक्रमात भाजपाचे कमळ फुलणार असल्याचं विधान केलं होतं. "भाजप म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे", असं ते म्हणाले होते. महेश कोठारेंच्या या विधानानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका करत "तात्या विंचू तुम्हाला चावेल", असं म्हटलं होतं. राऊतांच्या टीकेनंतर आता महेश कोठारेंनी प्रतिक्रिया देत त्यांची बाजू मांडली आहे.
महेश कोठारेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "हे माझं प्रामाणिक आणि खरं मत आहे. मी माझं मत व्यक्त करु शकतो, मला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. जे मी म्हटलं ते मनापासून म्हटलं आहे. त्यामुळे इथे राजकारण आणण्याचा संबंधच येत नाही. मी एक नागरिक म्हणून हे वक्तव्य केले. संजय राऊतांनी जे म्हटलं, ते त्यांचं मत होतं. त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं. संजय राऊतांनी माझ्याविषयी जी टिप्पणी केली, त्याला माझी हरकत नाही. पण मी माझं मत मांडलं. मी या मतावर ठाम आहे. माझं मत निर्विवाद आहे. संजय राऊत यांचाही मी खूप आदर करतो. पण माझं मत हे माझं मत आहे".
नेमकं काय म्हणाले होते महेश कोठारे?
मागाठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात महेश कोठारे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात ते म्हणाले होते की "हा कार्यक्रम आपल्या घरचा आहे. भाजप म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या कार्यक्रमापर्यंत मुंबईवर कमळ फुललेलं असेल याची मला गॅरंटी आहे. आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचा आहे, पण यावेळचा महापौरही इथून निवडून गेलेला असेल".
संजय राऊतांनी केलेली बोचरी टीका
"महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना? मला याबद्दल शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. तुम्ही जर असे काही बोलत राहिलात तर रात्री येऊन तो तुम्हाला चावेल आणि गळाही दाबेल", असं म्हणत संजय राऊतांनी कोठारेंवर टीकास्त्र सोडलं होतं.
Web Summary : Mahesh Kothare reaffirmed his support for BJP after Sanjay Raut's criticism. Kothare asserted his right to express his political views, emphasizing his admiration for PM Modi and predicting BJP's rise in Mumbai.
Web Summary : संजय राउत की आलोचना के बाद महेश कोठारे ने भाजपा के लिए अपना समर्थन दोहराया। कोठारे ने अपने राजनीतिक विचारों को व्यक्त करने के अपने अधिकार पर जोर दिया, पीएम मोदी के लिए अपनी प्रशंसा पर जोर दिया और मुंबई में भाजपा के उदय की भविष्यवाणी की।