लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. लक्ष्मीकांत आज आपल्यात नसले तरीही त्यांचे सिनेमे अनेकजण आवडीने पाहतात. लक्ष्या या नावाने सर्वांचे लाडके असणारे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं रिअल लाईफमध्ये प्रिया बेर्डे यांच्याशी लग्न झालं. मनोरंजन विश्वात काम करत असताना लक्ष्मीकांत यांची अनेक अभिनेत्रींसोबत जोडी जमली. यावेळी कोणत्या अभिनेत्रीबद्दल कधी मनात आकर्षण निर्माण झालं का, असा प्रश्न लक्ष्याला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावेळी लक्ष्याने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
अभिनेत्रीबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं का
शेखर सुमन यांना दिलेल्या एका मुलाखतीत लक्ष्याचा दिलखुलास अंदाज सर्वांना बघायला मिळाला होता. त्यावेळी शेखर यांनी लक्ष्याला विचारलं होतं की, "कधी कोणत्या खास अभिनेत्रीबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं का?" या प्रश्नाचं उत्तर देताना लक्ष्या म्हणाला की, "आकर्षण तर खूप होतं." पुढे शेखर सुमन लक्ष्याला विचारतात की, "मग अशावेळी भावनांवर नियंत्रण कसा मिळवतोस". यावर लक्ष्या म्हणतो, "आपल्याला काही मिळणार नाही हे माहिती असतं", असं उत्तर देताच लक्ष्यासोबत शेखर सुमन सर्वजण खळखळून हसतात. अशाप्रकारे लक्ष्याच्या हजरजबाबीपणाचा अनुभव सर्वांना आला.
लक्ष्मीकांत यांचं १६ डिसेंबर २००४ रोजी निधन झालं. लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक मराठी तसेच हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. सलमान खानसोबतही लक्ष्याने अभिनय केला होता. लक्ष्मीकांत यांची भूमिका असलेले 'अशी ही बनवाबनवी', 'थरथराट', 'दे दणादण', 'शुभ बोल नाऱ्या', 'एक होता विदुषक', 'पछाडलेला' हे सिनेमे प्रेक्षकांना खूप आवडले. हसवणूक आणि करमणूक यांचा अनोखा संगम लक्ष्मीकांत यांच्या सिनेमांमध्ये दिसतो.