अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांच्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. रिंकू आणि कृष्णराज महाडिक यांनी एकत्र कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी त्या दोघांचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमुळे प्रचंड चर्चा रंगली होती. रिंकू महाडिकांच्या घरची सून होणार की काय, अशा चर्चाही रंगल्या होत्या. त्यांच्यात नेमकं काय कनेक्शन आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता यावर कृष्णराजने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
कृष्णराजने याबाबत साम टीव्हीला मुलाखत दिली. "माझी सगळ्यांना विनंती आहे की माझ्या फोटोचा चुकीचा अर्थ काढू नका. त्या माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत. आम्ही ठरवूनच भेटलो होतो. कोल्हापूरला एक कार्यक्रम होता. म्हणून त्या आल्या होत्या. त्यादरम्यान आमची भेट झाली. आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे फोटो काढला आणि माझ्या ऑफिस टीमकडून तो पोस्ट केला गेला. त्यावरुन भरपूर अफवा पसरवल्या जात आहेत. पण, आमच्यात तसं काहीच नाही", असं कृष्णराजने म्हटलं आहे.
कोण आहे कृष्णराज महाडिक?
कृ्ष्णराज महाडिका हा भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा आहे. कृष्णराज हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. त्याचं स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे. याशिवाय तो फॉर्म्युला कार रेसरही आहे. अनेक उपक्रमांतून कृष्णराज सामाजिक कार्यात हातभार लावत असतो. यंदाच्या (विधानसभा २०२४) निवडणुकीसाठीही तो उत्सुक असल्याच्या चर्चा होत्या.