Join us

"चित्रपट मिळत नाहीत का?" विचारणाऱ्या चाहत्याला क्रांतीचं चोख उत्तर, व्याकरणातील चूक दाखवत केली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 09:46 IST

क्रांतीला चाहत्याने "तुम्हाला चित्रपट मिळत नाहीत का?" असा प्रश्न विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाला क्रांतीने अगदी चोख पद्धतीने उत्तर दिलं. विशेष म्हणजे क्रांतीने या चाहत्याला त्याची व्याकरणातील चूकही दाखवून दिली.

क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये काम करून क्रांतीने अभिनयाचा ठसा उमटवला. 'जत्रा', '३ बायका फजिती ऐका', 'काकण', 'खो खो', 'इश्श्य', 'फक्त लढ म्हणा', 'फुल ३ धमाल', 'माझा नवरा तुझी बायको' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. क्रांती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते. चाहत्यांनाही क्रांतीचे हे व्हिडिओ पसंत पडतात. 

नुकतंच क्रांतीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्याने क्रांतीला "तुम्हाला चित्रपट मिळत नाहीत का?" असा प्रश्न विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाला क्रांतीने अगदी चोख पद्धतीने उत्तर दिलं. विशेष म्हणजे क्रांतीने या चाहत्याला त्याची व्याकरणातील चूकही दाखवून दिली. क्रांतीच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्याने "तुम्हाला चित्रपट भेटत नाहीत का?" असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना क्रांतीने सर्वप्रथम त्याचं व्याकरण सुधारलं. 

क्रांती म्हणाली, "भेटत नाही मिळतं". पुढे तिने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत त्याची बोलती तर बंद केलीच शिवाय इतरांची मनंही जिंकली. "उत्तर आहे...कधी कधी नाही आणि कधी कधी मिळतात पण माझ्या लहान मुलांमुळे तारखा अॅडजस्ट होत नाहीत. आता काही चित्रपट करतेय. लवकरच प्रदर्शित होतील". 

दरम्यान, क्रांती रेडकरने २०१७ मध्ये समीर वानखेडे यांच्याशी लग्न केलं. तिला दोन जुळ्या मुली आहेत. आई झाल्यानंतर लेकींच्या संगोपनासाठी क्रांतीने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता. काही महिन्यांपूर्वी क्रांती ढोलकीच्या तालावर या शोच्या परिक्षकाच्या खूर्चीत बसलेली दिसली होती. 

टॅग्स :क्रांती रेडकरसेलिब्रिटी