'जत्रा' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. २००५ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतो. केदार शिंदेंच्या या सिनेमातील डायलॉग आजही प्रेक्षकांना जसेच्या तसे पाठ आहेत. 'जत्रा'मध्ये अनेक नवखे कलाकार दिसले होते. क्रांती रेडकरनेही या सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. 'जत्रा'ने क्रांतीला प्रसिद्धी मिळवून दिली. पण, या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी क्रांती मोठ्या अपघतातून वाचली होती. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने 'जत्रा' सिनेमाचा हा भयानक प्रसंग सांगितला.
लोकमत फिल्मीच्या कट्ट्यावर 'जत्रा' सिनेमातील कलाकारांचं रियुनियन झालं होतं. केदार शिंदे, प्रिया बेर्डे, भरत जाधव, क्रांती रेडकर आणि सिद्धार्थ जाधव यांनी लोकमत फिल्मीच्या 'लाइट्स कॅमेरा रियुनियन' या नव्या कोऱ्या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये कलाकारांनी 'जत्रा' सिनेमाच्या अनेक आठवणी आणि किस्से सांगितले. केदार शिंदेंनी असाच एक प्रसंग शेअर केला. त्यांच्यामुळेच जत्रा सिनेमाच्या शूटिंगवेळी झालेल्या अपघातातून क्रांती सुखरुप बचावली होती. ते म्हणाले, " क्रांतीचा एक किस्सा मला आठवतोय. आमचं शूटिंग सुरू होतं आणि अचानक पाऊस पडल्यामुळे आम्ही पॅकअप केलं होतं. दुपारी काही लोकांना असं वाटलं की पाचगणीला जाऊन मजा करावी. आम्ही आमच्या ऑफिसमध्ये होतो आणि मला कळलं की हे पाचगणीला निघाले. त्यांच्यात क्रांतीदेखील आहे. दोन गाड्या होत्या. आणि मला कसंही करून तिला थांबवण्याचा प्रयत्न करायचा होता".
"मी निरोप पाठवला आणि क्रांती घाटात पुढच्या गाडीतून उतरुन मागच्या गाडीत बसली. ती गाडी परत युटर्न मारून निघाली. त्या पुढच्या गाडीचा नंतर अपघात झाला. आणि त्या गाडीत बसलेल्या लोकांना प्रचंड लागलं होतं. काय स्वामींची कृपा असेल माहीत नाही...तेव्हा मी क्रांतीला फोन करुन निरोप पोहोचवला. तेव्हा मोबाईल वगैरे असं काही फार नव्हतं. पण, तो निरोप पोहोचला", असंही पुढे त्यांनी सांगितलं.
या अपघाताबद्दल सांगताना क्रांती म्हणाली, "जी व्यक्ती माझ्या सीटवर बसलेली त्याच्या चेहऱ्यावर ६२ टाके पडले होते. त्याचे सगळे दात घशात गेले होते. त्याच्या जागी मी असते तर माझं अभिनेत्री म्हणून करिअर संपलं असतं. तो मुलगा अजूनही इंडस्ट्रीत प्रोडक्शनमध्ये आहे. तो मुलगा मागच्या गाडीत होता. त्याने मला येऊन सांगितलं. मग मी उतरले आणि तो येऊन माझ्या जागेवर बसला. जेव्हा तो शुद्धीवर आला त्याने पहिलं हेच विचारलं की क्रांतीला किती लागलंय. मी त्या गाडीतून उतरले हे तो विसरला होता. मला वाटतं स्वामीच तेव्हा होते".