Join us

चिमुकल्यांच्या गोड आवाजातील 'रुपेरी वाळूत, माडांच्या बनात' व्हिडिओ होतोय व्हायरल, जाणून घ्या या चिमुरड्यांबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 16:09 IST

या दोघांच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. या मुलांचे कौतूक दिग्दर्शक रवी जाधवनेदेखील केले आहे.

सोशल मीडिया माध्यम हे आताच्या काळतील सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. सामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियामुळे काही लोक एका रात्रीत लोकप्रिय ठरले आहेत. याचं ताजे उदाहरण म्हणजे रानू मंडल. सध्या असाच दोन निरागस मुलांचा गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ही मुलं रुपेरी वाळूत, माडांच्या बनात हे गाणं गात आहेत.  त्यांच्या आवाजातील सूर, गाण्यातील निरागसता आणि मुख्य म्हणजे पाठांतर बघून आपल्यालाही सुखद धक्का बसेल. या मुलांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. 

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता रवी जाधवने त्यांच्या इंस्टाग्रामवर या मुलांची माहिती दिली आहे.

रवी जाधवने या मुलांचा व्हिडिओ शेअर करत सांगितले की,मंजेश्वर ब्रदर्स. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात राहणाऱ्या अमेय मंजेश्वर यांची ही दोन मुले. मोठा अर्जुन आणि छोटा अर्णव. दोघांचा जन्म ऑस्ट्रेलियातील. त्यामुळे हिंदी व मराठी थोडेसे कच्चे. परंतु या दोन्ही भावंडाना मराठी आणि हिंदी गाणी गाण्याची मात्र प्रचंड आवड. या लॉकडाऊनच्या काळात त्यांची ही गाणी त्यांच्या पालकांना व मित्रमंडळींना प्रचंड आनंद आणि ऊर्जा देत होती. त्यामुळेच त्यांच्या वडिलांनी त्यांची काही गाणी मोबाईल वर रेकॉर्ड केली व त्याचे 'Manjeshwar Brothers' या नावाने युट्युब चॅनेल सुरु केले. बघता बघता ह्या मुलावर नेटकऱ्यांच्या कौतुकाचा वर्षाव व्हायला आणि शेअरचा पाऊस पडायला लागला. ह्या मुलांची निरागसता, सच्चेपणा आणि आनंद घेत गाण्याची वृत्ती आपल्यालाही एक अद्भुत आनंद देऊन जाते. ह्या सर्वांची ओळख करून दिल्याबद्दल अचला दातार यांचे आभार आणि ह्यांचे व्हिडीओ करून हा आनंद जगभरातील लोकांसोबत शेअर केल्याबद्दल अमेय मंजेश्वर यांचे ही शतशः आभार. 

युट्युबवर मंजेश्वर ब्रदर्स चॅनेलवर अर्जुन व अर्णव यांची बरीच गाणी आहेत. या चॅनेलवर आकाशी झेप घे रे पाखरा, चला जाता हू अशी बरीच गाणी आहेत.

टॅग्स :रवी जाधवसोशल व्हायरल