Join us
Daily Top 2Weekly Top 5

'...हल्ली मराठीत काही चॅनलवाल्यांनी'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 16:24 IST

किरण माने यांनी फेसबुकवर प्रशांत दामले यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला. शिवाय त्यांनी प्रशांत दामलेंचे भरभरुन कौतुक केले. 

बिग बॉस मराठी शोमधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता म्हणजे किरण माने. उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे ते कायम चर्चेत येत असतात. किरण माने कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. पोस्टद्वारे सामाजिक किंवा कलाक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर परखडपणे आपलं मत मांडत असतात. नुकतेच जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर झाला. यावर किरण माने यांनी फेसबुकवर प्रशांत दामले यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला. शिवाय त्यांनी प्रशांत दामलेंचे भरभरुन कौतुक केले. 

किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहले, '...हल्ली मराठीत काही चॅनलवाल्यांनी जाहिरात चमकदार करण्याच्या नादात 'सुपरस्टार', 'महानायक' असे शब्द लैच स्वस्त करून टाकलेले आहेत. उठसूठ कुणाही आठदहा सिनेमात किंवा नाटकात दिसलेल्या नटाला 'सुपरस्टार' हे पद देतात चिकटवून बिनधास्त. दहा फ्लाॅप आणि साता-नवसातून एखादा हिट देणार्‍यालाही 'महाराष्ट्राचा महानायक'वगैरे टॅग लावून देतात. त्यामुळे आजकाल हा शब्द लैच गुळगुळीत झालाय. त्या शब्दाचं महत्त्वच कमी झालंय. पण खरंच, खरा 'सुपरस्टार' कोण असतो??'.

'सिनेमा किंवा नाटक, चांगलं असेल तर चालतंच... पण ज्या नटावरच्या केवळ प्रेमासाठी प्रेक्षक त्याचा वाईट सिनेमा किंवा वाईट नाटकही आवर्जुन थिएटरपर्यन्त जाऊन पहातात.. अमिताभचे कित्येक भंगार सिनेमेही किंवा काशिनाथ घाणेकरांची वाईट नाटकंही लोकांनी गर्दी करकरून पाहिली. शाहरूखचा 'पठाण' हा वाईट सिनेमाही सुप्परडुप्पर हिट्ट झाला. हे खरे सुपरस्टार!', असे माने यांनी म्हटलं.  

पुढे पोस्टमध्ये ते म्हणतात, 'आजच्या काळात मराठी सिनेमात असा एकही अभिनेता नाही, ज्याच्यावरील केवळ प्रेमापोटी लोक त्याचा 'वाईट सिनेमा'ही थिएटरपर्यन्त जाऊन, तिकीट काढून पहातात कुणीही नाही ! त्यामुळे मराठी सिनेमाला अशोकमामा-लक्ष्यामामा हे शेवटचे सुपरस्टार लाभले असं म्हणता येईल.'पण नाटकात मात्र आजही असा सुपरस्टार आहे. ज्याचं कुठलंही नाटक लागलं की, फक्त त्याच्या नांवावर 'हाऊसफुल्ल'चा बोर्ड लागतोच ! नाटक चांगलं असो वा वाईट, ते कमीत कमी अडीचशे ते तीनशे प्रयोग करतंच ! त्याचं नांव वन ॲन्ड ओन्ली प्रशांत दामले'.

'मी स्वत: त्याच्यासोबत 'श्री तशी सौ' हे नाटक केलंय. बारा वर्षांपूर्वी. नाटकात मी 'श्री' आणि वंदना गुप्ते 'सौ'. प्रशांत दामले सुत्रधाराच्या भुमिकेत होता. दामलेची लोकप्रियता 'याची देही याची डोळा' पहायला मिळाली. उभा-आडवा महाराष्ट्रच नव्हे तर इंग्लंड-स्काॅटलंड मधले दौरेही हाऊसफुल्ल झालेले अनुभवले... विशेष म्हणजे त्याची ती लोकप्रियता आमच्या नाटकाच्या दहा वर्ष आधीही होती, आणि आजही टिकून आहे!', असं किरण माने यांनी म्हटलं. 

'मराठी व्यावसायिक नाटकाच्या या सुपरस्टारला काल मराठी रंगभूमी दिनानिमित्त 'विष्णूदास भावे पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं. 'नाटक' या कलाप्रकाराला पूर्णवेळ वाहून घेतलेल्या अस्सल नाटकवाल्याला हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याचा मनापासून आनंद आहे. सलाम दामलेज्... लब्यू', या शब्दात किरण माने यांनी प्रशांत दामले यांचे कौतुक केले. 

टॅग्स :किरण मानेमराठी अभिनेताप्रशांत दामले